खेड: तालुक्यातील आंबडस सारख्या दुर्गम आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागातील शुभम मोरे या तरुणाची पॅरा टूपर म्हणून भारतीय सैन्य दलात नियुक्ती झाली आहे. लहानपणापासूनच सैनिकांबद्दलचे त्याला आकर्षण होते. आपणही सैन्य दलात जायचे आणि देशाची सेवा करायचे असा निश्चय त्याने केला होता. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याच्यासाठी हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. पण, तरीही त्याने मनात जिद्द बाळगली आणि कष्टाची तयारी केली. जिद्द आणि कष्ट यांची जोड मिळताच लहानपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न सत्यात पोहोचले.
शुभम मोरे याचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण आंबडस येथील जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये झाले. त्यानंतर बारावीचे उच्च माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल अँड जुनियर कॉलेजपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी भरणे येथील कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या तु. बा. कदम महाविद्यालयात प्रवेश घेतला.
शुभम मोरे याने सैनिक सेवेमध्ये जाण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तो या महाविद्यालयातील एनसीसी विभागामध्ये दाखल झाला. येथूनच खऱ्या अर्थाने शुभमच्या
भावी आयुष्याला कलाटणी मिळाली. या स्वप्नांना पैलू पाडण्याचे व त्याच्या प्रयत्नांना दिशा देण्याचे काम महाविद्यालयाने केले. आत्मविश्वास व प्रेरणा यांच्या जोरावर भारत सरकारच्या अग्निवीर
भरतीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतले व यश खेचून आणले. सध्या भारतीय सैन्यामध्ये आग्रा येथे ६ पैरा स्पेशल फोर्समध्ये पॅरा टूपर या पदावर तो कार्यरत आहे. या स्पेशल फोर्सच्या वतीने जम्मू काश्मीर येथे आपली सध्या सेवा बजावत आहे. शुभम मोरे याच्या यशामागे कुणबी शिक्षण प्रसारक संस्था व तु. बा. कद महाविद्यालयाचा खूप मोठा वाटा आहे. संस्था सचिव अॅड. तु. ल. डफळे नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रेरित केले आहे आणि करत आहेत.
खेड परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना सैनिकी सेवेमध्ये घेऊन देशाची सेवा करता यावी व विद्यार्थ्यांचे देश सेवेचे स्वप्न पूर्ण करता यावे याच उदात्त हेतूने संस्था सचिव अॅड. तु. ल. डफळे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतूनच
महाविद्यालयात एनसीसी विभागाची सन २०२०-२१ मध्ये स्थापना केली. सध्या एनसीसीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत आहे. त्यांचे भारतीय सैन्यामध्ये जाण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्राचार्य व्ही. एन. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. स्वप्नाली दळवी, प्रा. स्नेहा जैन व प्रा. संदीप कांबळे परिश्रम घेत आहेत. याच परिश्रमाच्या आणि कष्टाच्या जोरावरच शुभम मोरे याला यशाला गवसणी घालता आली आहे हे महाविद्यालयाचे मोठे यश आहे.
Reviewed by ANN news network
on
३/०५/२०२४ ०८:५९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: