महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने बँकॉक येथे सकारात्मक स्पंदनांच्या महत्त्वाविषयीचे संशोधन सादर !
सात्त्विक वृत्ती असलेले लोक आनंद, स्थिरता आणि शांतीचा अनुभव घेतात ! - शॉर्न क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
पुणे : ‘सात्त्विक वृत्तीचे लोक सकारात्मक सूक्ष्म स्पंदने निर्माण करतात, उत्तम गुणवत्तेचे विचार करतात आणि आनंद, स्थिरता अन् शांतीचा अनुभव घेतात. याउलट, तामसिक वृत्तीच्या लोकांमध्ये व्यक्तीमत्त्वातील दोष अधिक असतात आणि त्यांच्या मनात कमी गुणवत्तेचे विचार असतात. ज्यामुळे त्यांमध्ये नकारात्मक सूक्ष्म स्पंदने आणि तणाव निर्माण होतो’, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. नुकतेच बँकॉक, थायलँड येथे नुकत्याच झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅप्पीनेस अँड वेल-बिईंग (ICHW2024)’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत होते. त्यांनी ‘सूक्ष्म सकारात्मक स्पंदने आनंदप्राप्तीचाचा शोध कसा सक्षम करतात’ हा शोधनिबंध सादर केला. याचे लेखक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले असून श्री. क्लार्क सहलेखक आहेत.
ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २१ राष्ट्रीय आणि ९२ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ११३ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत.
श्री. शॉन क्लार्क यांनी सूक्ष्म स्पंदने व्यक्तीवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव कसा करतात, याचा अभ्यास करणार्या काही चाचण्या सादर केल्या. प्रथम चाचणीत, व्यक्तींनी मद्यसेवन केल्यानंतर ऑरा स्कॅनरने घेतलेल्या चाचणीवरून असे लक्षात आले की, त्यांच्यातील नकारात्मकता वाढून सकारात्मकता केवळ ५ मिनिटांत पूर्णपणे नाहीशी झाली. याउलट, नारळपाणी या सात्त्विक पेयाच्या सेवनानंतर व्यक्तींच्या प्रभावळीवर त्वरित सकारात्मक परिणाम झाला.
द्वितीय चाचणीत रोगग्रस्त अवयव नकारात्मक स्पंदने कशी प्रक्षेपित करतात, हे दिसून आले. बालवयापासून त्वचारोगाने (Eczema) ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या चेहर्यावरून प्रक्षेपित होणारी नकारात्मक प्रभावळ केवळ आध्यात्मिक उपचार केल्याने कशी लक्षणीयरीत्या कमी झाली, हे त्यांनी या चाचणीत स्पष्ट केले.
तृतीय चाचणीत, २२ कॅरेट सोन्याने बनवलेल्या २ वेगवेगळ्या नक्षी असलेल्या अलंकारांची सूक्ष्म स्पंदनांच्या दृष्टीने तुलना केली गेली. जरी दोन्ही हार सोन्याचे असले, तरी सात्त्विक नक्षी असलेला सोन्याचा हार सकारात्मक स्पंदने प्रसारित करतो, याउलट तामसिक नक्षीचा हार नकारात्मक स्पंदने प्रसारित करतो, असे आढळले. श्री. क्लार्क यांनी पुढे स्पष्ट केले की, हेवी मेटल सारखे संगीत ऐकणे आणि भयपट पाहणे यांसारख्या मनोरंजनात रममाण झाल्याने व्यक्तीच्या प्रभावळीमधील सकारात्मकता पूर्णपणे नाहीशी होऊ शकते. तसेच काळा रंग सर्वाधिक तामसिक असल्याने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने नकारात्मकता अधिक प्रमाणात ग्रहण होते.
या सर्व चाचण्यांच्या निरीक्षणांवरून श्री. क्लार्क यांनी निष्कर्ष मांडला की, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया, नामजप करणे अन् आध्यात्मिक उपाय पद्धती, उदा. मीठ पाण्यात १५ मिनिटे पाय ठेवून उपाय करणे, हे व्यक्तीच्या प्रभावळीमधील सकारात्मकता वाढवण्याचे आणि मनात उत्तम गुणवत्तेचे विचार येण्यासाठी अत्यंत प्रभावी मार्ग आहेत.
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२४ ०५:३९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: