मुंबई : आंतरराष्ट्रीयस्तरावर मानवी तस्करी करणार्या टोळीच्या प्रमुखासह अन्य एकाला मुंबई पोलिसांच्या गुन्हेशाखा कक्ष आठच्या पथकाने अटक केली आहे.
जेरी फिलीप्स जेकब, वय ४६ वर्षे, गॉडफ्री थॉमस अल्वारेस, वय ३९ वर्षे अशी या दोघांची नावे आहेत.
बेरोजगार तरूणांना परदेशातील उत्तम पगार असलेल्या नोकरीचे आमिष दाखवून, त्यांना बेकायदेशीरपणे अडकवून ठेवून व त्यांच्याकडून बेकायदेशीर कामे करवून घेत असल्याच्या तक्रारी सातत्याने पोलिसांकडे येत होत्या. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांकडे २९८/२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ४२०, ३७०, ३२३, ३४२, ३४६, ३४७, ३८६, ५०४, ५०६, ३४, १२० (ब) व इमीग्रेशन अॅक्ट १९८३ कलम १०, २४ अन्वये दाखल असलेला गुन्हा गुन्हेशाखा, कक्ष ८ कडे वर्ग करण्यात आला होता.
तपास सुरू असताना या प्रकरणाचे सूत्रधार मुम्बईत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तातडीने हालचाली करत दोन्ही आरोपी पसार होण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेतले.
या दोघांनी भारतातील गरजू तरूणांना चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून, त्यांना लाओस देशामध्ये विनापरवाना प्रवेश करावयास लावला आणि त्यांच्याकडून बेकायदेशीर कृत्ये करवून घेतली. विरोध करणाऱ्या तरूणांना बेकायदेशीरपणे अडवून ठेवत भारतात परतण्यासाठी खंडणी घेतली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, उप आयुक्त (प्रकटीकरण - १) विशाल ठाकुर, सहाय्यक आयुक्त डी (प.) महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-८ चे प्रभारी निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे,सहायक निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, मधुकर धुतराज, राहुल प्रभू, संग्राम पाटील, उपनिरीक्षक विकास मोरे, जयेंद्र कानडे, सहायक उपनिरीक्षक शिरसाट, बनसोडे, हवालदार यादव, किणी, काकडे,सावंत, रहेरे, सटाले,गायकवाड यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: