भोसरी एमआयडीसी पोलिसांची कारवाई; ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पसार होणार्या दोघांना आणि चोरीचे सोने विकत घेणार्या एकाला अटक करण्यात यश मि़ळविले आहे. यातील मंगळसूत्रचोर दोघे सख्खे भाऊ आहेत. आरोपींकडून ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या चोरांच्या अटकेमुळे भोसरी एमआयडीसी पोलीसठाण्याच्या हद्दीतील ३ आणि देहुरोड पोलीसठाण्याच्या हद्दीतील १ असे ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अक्षय राजू शेरावत वय २३ वर्षे आणि अजय राजू शेरावत. वय २२ वर्षे अशी या दोघांची नावे आहेत. ते हिंगणगाव पोस्ट आष्टापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे राहणारे आहेत.तर चोरीचे सोने विकत घेणार्या अनिल अंकुश नानावत वय ३९ वर्षे राहणार सणसवाडी, तालुका शिरुर, जिल्हा पुणे यालाही अटक करण्यात आली आहे.
११ जानेवारी रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास मोशी, बोर्हाडेवाडी येथे एका पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले गेले होते. या गुन्ह्याचा तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत होते.तपासादरम्यान पोलिसांना त्यांच्या खबर्याने माहिती दिली की, ३ मार्च रोजी एका विनानंबरप्लेटच्या पल्सर मोटारसायकलवरून दोघेजण खडीमशीनमार्गे मोशीमध्ये सोने विकण्यासाठी येणार आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांचे पथक त्या मार्गावर दबा धरून बसले. सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे एक मोटारसायकल येताच पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता अक्षय शेरावत याच्याकडे सोन्याचे मंगळसूत्र सापडले. अधिक चौकशी केली असता त्यांनी हे मंगळसूत्र मोशी येथील महिलेल्या गळ्यातून खेचले असलेले मंगळसूत्र असल्याची कबुली दिली.
त्यांना ताब्यात घेऊन पोलिसीखाक्या दाखविल्यावर त्यांनी अन्य ठिकाणीही असेच गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी या गुन्ह्यांतील सोने अनिल अंकुश नानावत वय- ३९ वर्षे राहणार सणसवाडी, तालुका शिरुर, जिल्हा पुणे याला विकले असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याविरोधात ०५ मार्च रोजी एमआयडीसी भोसरी पोलीसठाण्यात ४४/२०२४ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३९४,४११,३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यालाही पोलिसीखाक्या दाखविल्यावर त्याने सोने काढून दिले.
आरोपींकडून ८ तोळे ३०० मिलीग्रॅम सोने आणि एक पल्सर मोटारसायकल असा एकंदर ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, भोसरी एमआयडीसी पोलीसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बापू ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे, अंमलदार चंद्रकांत गवारी, शरद गांधिले, संजय जरे, स्वप्निल शेलार, गणेश बो-हाडे, राहुल लोखंडे, नितिन खेसे, भागवत शेप, विशाल काळे, अनिल जोशी, प्रवीण मुळूक,अक्षय क्षीरसागर. आंनद जाधव. अनिकेत कांबळे. खंदारे व राजू जाधव यांनी केली.
या गुन्हयाचा पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा