महापालिकेच्या आर्थिक लुटीकडे आयुक्तांची डोळेझाक; मारुती भापकर यांचा आरोप

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाहूनगर येथील उद्यानाच्या कामात महापालिकेच्या पॅनेलवर असलेला आर्किटेक्ट आणि त्याच्या भावाने संगनमताने महापालिकेच्या १ कोटी २० लाख रुपये निधीवर डल्ला मारला आहे. हा प्रकार पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निदर्शनास आणूनही ते कारवाई करण्यात कुचराई करत आहेत. आता हा भ्रष्टाचार पुराव्यानिशी आयुक्तांसमोर मांडण्यात आला आहे. त्यांनी या प्रकरणी काहीही कारवाई केली नाही तर आर्किटेक्ट, त्यांचे बंधू या दोघांसह आयुक्तांविरोधातही आम्ही न्यायालयात जाणार आहोत असा इशारा माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ता मारुती भापकर यांनी २० मार्च रोजी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी त्यांच्यासोबत मानव कांबळेही उपस्थित होते.

महापालिका शाहूनगर येथे राजर्षी शाहू उद्यानाचा पुनर्विकास करत आहे.त्यासाठी महापालिकेच्या पॅनेलवरील आर्किटेक्ट हार्दिक के. पांचाळ हे सल्लागार म्हणून काम पहात आहेत. भापकर यांनी काही महिन्यांपूर्वी पांचाळ यांच्या पॅनेलवरील निवडीला आक्षेप घेतला होता. त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून आपला पॅनेलमध्ये समावेश करून घेतला असल्याचा आरोप करत या प्रकरणाची च्क्षौकशी करण्याची मागणी भापकर यांनी आयुक्तांकडे केली होती. याबाबत माध्यमांशी बोलताना या सल्लागाराचे गुजराथ कनेक्शन असल्यामुळे आयुक्त दबावाखाली असावेत असा आपला अंदाजही त्यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.

आता या आर्किटेक्ट पांचाळ यांनी आपण सल्लागार असल्याचा गैरफायदा घेत वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी जवळच्या व्यक्तींना कामे दिल्याचा खळबळजनक आरोप भापकर यांनी केला आहे.

आर्किटेक्ट पांचाळ यांनी राजर्षी शाहू महाराज उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम आपलेच बंधू विशाल के. पांचाळ यांना दिले असून ते काम आपल्या भावाव्यतिरिक्त अन्य कोणालाही मिळू नये म्हणून निविदेत विशेष अटी घालण्यात आल्या असा गंभीर आरोपही भापकर यांनी पत्रकारपरिषदेत केला आहे.

या कामामध्ये फरसबंदीसाठी "45 X 30 सेमी रुंद 10 सेमी जाडीचा सापळा दगड वापरणे निविदेनुसार आवश्यक होते. मात्र विशाल पांचाळ यांच्या फर्मने त्याऐवजी कडप्पा वापरला असून हे काम १०२६ चौरस मीटर इतके करावयाचे होते. त्यासाठी ६७८६.३५ रुपये प्रति चौरस मीटर दर निश्चित करण्यात आला होता. हे काम वाढवून १५०८ चौरस मीटर इतके करण्यात आले आहे. याशिवाय इतरही अनेक गोष्टी निविदेनुसार झालेल्या नाहीत. पांचाळ बंधूंनी या कामात १ कोटी २० लाख रुपयांचा गैरव्यवहार केला आहे असा आरोप भापकर यांनी पत्रकार परिषदेत केला असून यासर्व आरोपांचे आवश्यक कागदोपत्री पुरावे आपण आयुक्तांकडे तक्रार अर्जाला जोडून सादर केले आहेत. आयुक्तांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी अशी मागणीही भापकर यांनी केली आहे. आयुक्तांनी कारवाई करण्यात कुचराई केल्यास पांचाळ बंधुंसह आयुक्तांविरोधात न्यायालयात दाद मागावी लागेल असेही म्हटले आहे.

महापालिकेच्या आर्थिक लुटीकडे आयुक्तांची डोळेझाक; मारुती भापकर यांचा आरोप महापालिकेच्या आर्थिक लुटीकडे आयुक्तांची डोळेझाक;  मारुती भापकर यांचा आरोप Reviewed by ANN news network on ३/२१/२०२४ ०९:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".