पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील एक फर्निचर व्यावसायिक आणि एक रिअल इस्टेट व्यावसायिक या दोघांनी एका महिलेला शेअरमार्केट मधून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिचे १० लाख ६९ हजार ५७५ रुपये हडपले आहेत. या दुक्कलीने फसवणूक केल्याच्या २० तक्रारी इतर राज्यात दाखल झाल्या असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत असून या मुळे मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फसवणूक झालेल्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वाकड पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला असून विकास नेमीनाथ चव्हाण (वय 43, रा. अथर्व विहार, गणेश नगर, नवी सांगवी) आणि प्रदीप कृष्णा लाड(वय 32, रा. रामनगर, पिंपळे गुरव, सांगवी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांनी आयबीकेआर क्रिसेंट अकॅडमी गोल्डमन सच यानावाने एक व्हॉट्सअॅप ग्रूप तयार केला होता. त्याद्वारे ते उत्तम नफा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून रक्कम स्वीकारत होते. या ग्रूपची जाहिरात फेसबुकवर पाहून तक्रारदार महिला त्या ग्रूपला जॉईन झाली. तिने गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आरोपींनी आयबीकेआर सेक्युरिटीज या कंपनीत गुटवणूक करण्यास तयार आहात का असे तिला विचारले. तिने होकार दिल्यानंतर आरोपींनी तिला एक फॉर्म भरायला लावला. आणि, वेगवेगळ्या खात्यांवर पैसे पाठविण्यास सांगितले. तसेच तिला. आयबीकेआर अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करायला सांइगितले. त्यात तिला रोज होणारा नफा दिसत होता. मात्र, पैसे काढता येत नव्हते.यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्या महिलेने पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपींना अटक केली.
पोलिसांनी तपास करताना त्या महिलेने ज्या ११ खात्यात पैसे भरले होते त्यांची माहिती घेतली असता त्यात सुमारे ५० कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. असेच या दोघांविरोधात अन्य राज्यातही २० तक्रारी दाखल असल्याचे त्यांना दिसून आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक सागर पानमंद, प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, अंमलदार नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, कृष्णा गवळी, रजनीश तारु यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा