छबिलदास वास्तू नाबाद १००; वास्तू अभिवादन सोहळा

 


डावीकडून कार्यवाह आदटराव , कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी , रामदास पाध्ये , अध्यक्ष डॉ कोल्हटकर , अभिनेते बाळ धुरी , उपकार्याध्यक्ष गोसावी, खजिनदार ताम्हणे , उपकार्यवाह नलावडे

मुंबई : दादर मधील 'जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट' संचलित छबिलदास सारखी एखादी वस्तू जेव्हा शंभराव्या वर्षात पदार्पण करते तेव्हा ती घटना, तो क्षण, तो सोहळा सगळयांच्याच अभिमानाचा असणं स्वाभाविकच आहे.

दिनांक १२ मार्च, २०२४ ला सायंकाळी ठीक सहा वाजता या अद्भुत अशा सोहळ्याला प्रारंभ झाला. असंख्य आजी माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, हितचिंतक संस्थेच्या अनेक शाळांचे पदाधिकारी कर्मचारी वर्ग यांनी छबिलदास सभागृह खचून भरले होते. फुलांच्या, रंगांच्या रांगोळ्या, आकर्षक सजावट, बोलके फळे, नेत्रदीपक अशी रोषणाई, सनईचे सूर असे सगळीकडे मांगल्याचे, आनंदाचे वातावरण होते. अनेक माजी विद्यार्थी, शिक्षक यांच्या गाठीभेटी झाल्यामुळे जणू काही छबिलदास ची वास्तू ही कौतुकाने प्रेमाने रोमांचित झाली होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कार्यक्रमाचे आकर्षण असलेल्या 'छबिलदास कल्चर सेन्टर' चे उदघाटन प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते  बाळ धुरी 'छबिलदास वॉल'चे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर व संस्थेच्या इतिहासात प्रथमच कलाशिक्षकांच्या सुजनक्षमतेला, कलेला वाव देणाऱ्या पेंटिंग्स च्या प्रदर्शनाचे उद्घटन प्रमुख पाहुणे रामदास पाध्ये यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाची सुरवात मनमोहक अशा गणेश वंदनाने झाली. तर   विजय गोखले यांच्या एकपात्री अभिनयाने छबिलदास व्यासपीठाला पुनः श्य एकवार प्रायोगिक रंगभूमीची आठवण करून दिली. संस्थेचे कार्यवाह   प्रकाश अधटराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर उपस्थितांची मने जिंकून घेणारे आगळे वेगळे स्वागत इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कु. दुर्वा मांडवकर हिने केले.

हृदयस्पर्शी तो क्षण होता जेव्हा आद्य संस्थापक कै. अक्षीकरांच्या नातवाचा सपत्नीक व ज्येष्ठ शिक्षक श्री एस. डी. मपारा यांचा सत्कार केला गेला.  

संस्थेचे कार्याध्यक्ष  शैलेंद्र साळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करून 'छबिलदास'च्या बदलेल्या रूपाचे, वैभवाचे, बदलेल्या शैक्षणिक, सामाजिक भूमिकेचे महत्व सांगून भविष्याचा वेध घेत संस्थेची शाळांची, शिक्षकाची, पदाधिकाऱ्यांच्या कर्तव्ये, जबाबदारी यावर प्रकाश टाकला. "संस्थेचा कार्याध्यक्ष" म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. याबद्दल ईश्वराकडे कृतज्ञता ही व्यक्त केली.

प्रमुख पाहुणे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा देत आपल्या माजी शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपण आज जरी बोलक्या बाहुल्यांसाठी जगप्रसिद्ध असलो तरी आपल्यासारख्या बाहुल्याला बोलायला मात्र शाळेतल्या शिक्षकांनी शिकवले याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेते  बाळ धुरी यांनी छबिलदास च्या रंगभूमीविषयी, अभिनय क्षेत्राविषयी, शाळेतल्या गमती - जमतीविषयी मनमोकळा संवाद साधला. संस्थेचे अध्यक्ष  उल्हास कोल्हटकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातून व्यासपीठावरील मान्यवरांचे कौतुक आणि आभार मानून संस्थेच्या यशस्वीततेसाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींचा उहापोह केला. संस्थेतल्या  सगळ्या शाळा या आनंदी शाळा करण्याचे आव्हान केले.

कार्यक्रमाचा शेवट उपकार्यवाह    नलावडे  यांच्या आभार प्रदर्शनाने व पसायदानाने झाला. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन सौ. गीता केतकर व सौ. समृद्धी जगताप यांनी केले.

छबिलदास वास्तू नाबाद १००; वास्तू अभिवादन सोहळा छबिलदास वास्तू  नाबाद १००; वास्तू अभिवादन सोहळा Reviewed by ANN news network on ३/१३/२०२४ ०९:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".