थेऊरच्या मंडल निरीक्षक महिलेसह दोघांना लाच घेताना अटक

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील मंडल निरीक्षक, एक खासगी संगणक चालक आणि एका व्यक्तीस १२ मार्च रोजी ७ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पुणे कार्यालयातील कर्मचार्‍यांनी पकडले.

या प्रकरणी एका २५ वर्षांच्या तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली होती. जयश्री कवडे, मंडल अधिकारी थेऊर, ता. हवेली, जि. पुणे, योगेश कांताराम तातळे, वय २२ वर्षे, व्यवसाय खाजगी संगणक ऑपरेटर रा. चौधरी पार्क, बाळू कदम चाळ, दिघी, पुणे आणि  विजय सुदाम नाईकनवरे, वय ३८ वर्षे, व्यवसाय एजंट नागपूर चाळ, येरवडा पुणे अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदाराच्या आईच्या वडिलांच्या नावे  मौजे कोलवडी, ता. हवेली, जि. पुणे येथे असलेल्या शेतजमीनीच्या सातबारा उता-यावरील नाव कमी झाल्याचे दिसून आल्याने, त्या नावाची नोंद पुन्हा होण्यासाठी तक्रारदार यांची आजी व तिच्या बहिणींनी  तहसिलदार, हवेली, पुणे यांचेकडे रितसर अर्ज केला होता. या अर्जावर तहसिलदार यांनी तशी नोंद सातबारा उता-यावर करण्यासाठी तलाठी कोलवडी व मंडल अधिकारी थेऊर यांना आदेश दिले होते. 

तलाठ्याने केलेली नोंद मंजूर करण्यासाठी तक्रारदार थेऊर येथील मंडल अधिकारी जयश्री कवडे यांना भेटले असता, त्यांनी तक्रारदाराला विजय नाईकनवरे याला भेटण्यास सांगितले. नाईकनवरेयाने तक्रारदार नोंद मंजूर करण्यासाठी जयश्री कवडे यांच्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली. याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, पुणे येथे दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने १२ मार्च रोजी सापळा रचून थेऊर मंडल अधिकारी कार्यालयाच्या आवारात विजय नाईकनवरे याला ७ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. नाईकनवरे याला लाच मागण्यासाठी आणि ती घेण्यासाठी प्रवृत्त केले म्हणून मंडलाधिकारी जयश्री कवडे आणि संगणक चालक योगेश तातळे यांनाही पकडण्यात आले.

या तिघांविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पुणे येथील पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले अधिक तपास करीत आहेत.

ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपरअधीक्षक डॉ. शीतल जानवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

थेऊरच्या मंडल निरीक्षक महिलेसह दोघांना लाच घेताना अटक  थेऊरच्या मंडल निरीक्षक महिलेसह दोघांना लाच घेताना अटक Reviewed by ANN news network on ३/१४/२०२४ ०८:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".