अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक (VIDEO)

 


पुणे : कुकडी डावा कालव्याचे तसेच घोड डावा आणि घोड उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन १ मार्चपासून सोडण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुकडी संयुक्त प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत घेण्यात आला. 

शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राम शिंदे, रोहित पवार, अतुल बेनके, संजय शिंदे, बबनराव पाचपुते, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई बुचके, पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (दूरदृष्यप्रणालीद्वारे), पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, १५ जुलै २०२४ पर्यंत धरणाचे पाणी प्राधान्याने पिण्यासाठी राखून ठेवावे. त्याप्रमाणे पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. तसेच टँकरसाठी पाणी स्रोत आदींचे नियोजन करावे, असेही श्री. पवार म्हणाले. 

या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगांना पाणी दिले जाते. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. सर्व भागात, पोटचाऱ्यांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना काटकसरीने सर्व शेतकऱ्यांना पाण्याच्या पाळ्या देण्याचे नियोजन करावे जेणेकरुन पुढील आवर्तनांसाठी अधिक पाणी उपलब्ध होऊ शकेल, असे निर्देशही त्यांनी दिले.

कालव्यांची गळती असल्यास ती काढण्यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत सहकारमंत्री श्री. वळसे पाटील यांनी तसेच उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या. 

कुकडी संयुक्त प्रकल्पात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे व डिंभे मिळून एकूण १५.८६५ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. कुकडी डावा कालव्याद्वारे १ मार्चपासून पाणी सोडण्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरले. तसेच कुकडी प्रकल्पाचे आगामी उन्हाळी आवर्तन पूर्ण झाल्यानंतर शिल्लक राहिलेला पाणीसाठा, तसेच पुढील पावसाळ्यापूर्वीची टंचाईची परिस्थिती पाहून उन्हाळी आवर्तन क्रमांक.२  घ्यावे किंवा कसे याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात येईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.

घोड प्रकल्पाचे पहिले आवर्तन १ मार्चपासून सोडण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच शिल्लक राहणारे पाणी पाहता दुसरे आवर्तनही शक्य असल्याचे सांगण्यात आले.

बैठकीच्या सुरवातीला कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व नियोजनाबाबत सादरीकरण केले.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक (VIDEO) अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक (VIDEO) Reviewed by ANN news network on २/२४/२०२४ ०४:५५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".