बुधवार, २१ फेब्रुवारी, २०२४

प्रख्यात निवेदक अमिन सयानी यांचे निधन



मुंबई : एकेकाळचे रेडिओवरील प्रख्यात निवेदक अमिन सयानी यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. 

उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र रजिल सयानी यांनी दिली आहे. 

एकेकाळी रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमाला आणि त्यामधील अमिन सयानी यांचे खुमासदार निवेदन श्रोत्यांसाठी पर्वणी असे. वर्षानुवर्षे लोकप्रिय असलेला बिनाका गीतमाला हा कार्यक्रम सयानी यांचे निवेदन आणि त्याकाळातील कर्णमधुर गाणी यामुळे लोकप्रिय होता.

गेली काहीवर्षे सयानी पाठदुखीने त्रस्त होते. त्यांना चालताना वॉकरची गरज भासत असे. आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


सयानी यांच्या निधनाने रेडीओच्या इतिहासातील सुवर्णअध्याय संपला;अजित पवार

 “रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओच्या सांगितिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. रेडीओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते त्या काळात अमिन सयानींनी १९५२ ते १९९४ अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडीओवर गीतमाला सादर केली. त्यांच्या शैलीदार, रसाळ निवेदनाने रेडीओवरील गीतांची गोडी कैकपटीने वाढवली. संगीतरसिकांच्या कितीतरी पिढ्यांचे कान त्यांच्या निवेदनानं तृप्त केले. त्यांनी रेडीओवर घेतलेल्या गायक, गीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगितिक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्यासारखा निवेदक भारतीय रेडीओवर असणं आणि त्याचा आवाज ऐकायला मिळणं, हा अवर्णनीय आनंद होता. त्यांचं निधन ही भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी आहे. मी अमिन सयानी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.


श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा कलावंत हरपला : देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ रेडीओ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाने आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्यकरणारा कलावंत हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आमची पिढी ही रेडीओवरील अमीन सयानी यांचा आवाज ऐकतच मोठी झाली. त्यांच्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने अनेक विक्रम रचले. या गीतमालेतील गाण्यांबरोबरच अमीन सयानी यांचा आवाज ऐकण्यासाठी रसिक आतुरतेने या कार्यक्रमाची वाट पहात असत.  त्यांनी अनेकांना आपल्या आवाजाचा वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन केले. त्यांच्या आवाजामुळे, त्यांच्या निवेदनाच्या शैलीमुळे अनेकांनी आपल्या निवेदनात बदल केले. त्यांच्या निवेदनाची शैली असलेली निवेदकांची एक पिढी तयार झाली. भाषेवर प्रेम करायला त्यांनी शिकविले. त्यांच्या निधनाने एक थोर निवेदक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना! 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा