महाराष्ट्र शासनाकडून इरादापत्र मंजूर
विठ्ठल ममताबादे
उरण : आवरे-उरण गावाचे सुपुत्र शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी स्थापन केलेल्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेमार्फत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात मु.-आवरे, ता.-उरण, जि.-रायगड येथे नवीन महाविद्यालय सुरु करण्यास इरादापत्र मिळण्यासाठीचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला होता. दि.१५ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे हा प्रस्ताव मंजूर करून संस्थेस 'शिक्षकमित्र बाळासाहेब म्हात्रे कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स' या नावाने नवीन वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यास इरादापत्र मंजूर करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयाचे संस्थेच्या विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.
ग्रामीण भागात सुरु होत असलेल्या या महाविद्यालयामुळे गरीब, कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी १९९२ रोजी या विभागात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरु केली. आपल्या या जन्मगावी वरिष्ठ महाविद्यालय व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची संधी या निमित्त प्राप्त होणे हीच खरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला श्रद्धांजली आहे, असे मत संस्थेचे विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे आणि इरादापत्र मिळण्यासाठीच्या बाबींची पूर्तता करण्यासाठी परिश्रम घेणारे संस्थेचे माजी विद्यार्थी प्राचार्य कमलेश सोनपसारे, अभिजीत पार्टे, समीर देवळेकर, महेश यादव, आवरे ग्रुप ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, वास्तू विशारद विलास कोयंडे, जमालुद्दीन सिद्दीकी, शोएब शेख, प्रविण पाटील व ॲड. तुषार कुंभार यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेमार्फत आवरे-उरण येथे सुरु होणार नवीन वरिष्ठ महाविद्यालय
Reviewed by ANN news network
on
२/१७/२०२४ ०७:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: