गांधीभवन मधील लोकसंसदेत परिवर्तनाचा निर्धार!

 


पुणे : पुण्यातील गांधीभवन येथे आज ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या  लोकसंसदेमध्ये परिवर्तनाचा निर्धार करण्यात आला! नागरीक,सिव्हील सोसायटी आता घरात बसणार नाही तर भाजपच्या विरोधात मतदान होईपर्यंत मैदानात खंबीरपणे काम करणार आहे, असे या लोक संसदेमध्ये निक्षून सांगण्यात आले.

युवक क्रांती दल,रिपब्लिक युवा मोर्चा,निर्भय बनो,पँथर आर्मी,स्वराज्य क्रांती सेना,संविधान प्रचारक चळवळ,सत्यशोधक बहुजन आघाडी,संविधानिक राष्ट्रवाद मंच आणि अभ्यासिका विद्यार्थी कृती समिती यांच्यावतीने लोकसंसदेचे आयोजन करण्यात आले.

केंद्र सरकार भारतीय संसदेला धर्मसंसद बनविण्याचा प्रयत्न करत आहे, हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भाजपविरोधी पक्ष संघटनांनी  रविवारी , दि.४ फेब्रुवारी रोजी ‘लोकसंसद’ हा कार्यक्रम आयोजित केला . त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.'लोकसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन करण्यासाठी सच्चा भारतीय मतदारांचे जनआंदोलन ' या उद्देशाने   लोकसंसद उपक्रम आयोजित करण्यात आला.

प्रारंभी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.सद्यस्थिती आणि भविष्याचा वेध,सत्ता परिवर्तनाची व्यूहरचना , मोदी सरकारची १० अपयशी वर्षे, भाजपचा खरा अजेंडा, सत्ता परिवर्तनाची रणनीती अशी अनेक सत्रे या लोकसंसदेमध्ये आयोजित करण्यात आली होती.

युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम कोथरूड येथील गांधीभवनात दुपारी एक ते सायंकाळी पाच या झाला. लोकसंसदेत रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे हे स्वागताध्यक्ष होते.  डॉ.विश्वंभर चौधरी, डॉ अभिजित वैद्य,अभ्यासक चंद्रकांत झटाले, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सत्तार शहा, धर्मगुरू बिशप थॉमस डाबरे,  ह. भ. प. धर्मकिर्ती परभणीकर, युनूस तांबटकर अशा अनेक मान्यवरांनी भाषणे केली.

सभागृहात डॉ. अभिजित वैद्य,डॉ. अच्युत गोडबोले, आनंद करंदीकर,डॉ. उर्मिला सप्तर्षी,डॉ. प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन, प्रशांत कोठदिया, फिरोज मुल्ला,अभय छाजेड, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, उत्पल व. बा., रवींद्र धनक,अप्पा अनारसे, एम. एस. जाधव, इद्रिस कारी, सुदर्शन चखाले आदी उपस्थित होते.

स्वागताध्यक्ष डंबाळे यांनी लोकसंसदेच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. लोकशाही व्यवस्था टिकली पाहिजे, असे ज्यांना ज्यांना वाटते त्यांच्यासाठी लोकसंसद हे जनआंदोलन आहे.नरेंद्र मोदींची लोकप्रियता, भाजपची ताकद गोबेल्स नीतीने तयार केली असून ती खोटी आहे, असे ते म्हणाले.


सिव्हील सोसायटी गप्प बसणार नाही: डॉ विश्वंभर चौधरी 

डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले,' इंडिया आघाडीची ताकद अजूनही चांगली आहे. भाजप आपली ताकद फुगवून सांगत आहे. भाजपचे दक्षिणेचे दार बंद झाले आहेत. पूर्वोत्तर भागात भाजप विरोधी वातावरण आहे.विरोधी पक्षाला हतबलता वाटली तर नागरिकांनी, सिव्हील सोसायटीने पुढे येवून या पक्षांना युद्धासाठी तयार केले पाहिजे.  शेतकरी भाजपाच्या विरोधात गेले आहेत.आर्थिक धोरणांमुळे मोदी सरकार हरणार आहे.कितीही पळपुटे बाजीराव महाराष्ट्रात भाजपकडे गेले तरी इथे ४७ टक्के मते इंडीया आघाडी कडे आहेत. चंद्रकांत पाटील हे कोथरुड मधून निवडणुक जिंकणार नाहित, असे भाजपचे लोक बोलतात.देशात भाजपा आघाडी २५० पर्यंत आटपणार आहे. नंतर भाजप अंतर्गत मतभेद उफाळून येणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या बद्दल प्रचंड सहानुभूती आहे. राज्यात १३ जागांच्या वर भाजपा जाणार नाही.उत्तरेची लादली जाणारी संस्कृती ठोकरून महाराष्ट्र धर्म जपला पाहिजे.


अनैतिक कारभारी बदलणे हाही सत्याग्रह: डॉ. सप्तर्षी

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,' नरेंद्र मोदी यांनी खोटे बोलण्याचा जागतिक विक्रम केला आहे. बकासुराची भूक भागत नसते, त्या प्रमाणे हे  रोज एक मुख्यमंत्री खात सुटले आहेत. मोदींनी, शहांनी सर्व राजकारण खराब करून टाकले आहे.

लोकसभा निवडणुक होईपर्यंत अनेक अटक सत्रे होणार आहेत.इडी ला पैसै खाणारे भाजपवाले  का दिसत नाहीत? ज्यांना निवडून दिले, ते काम करीत नसल्याने मतदारांनी निवडणुक हाती घ्यावी. अनैतिक कारभारी बदलणे हाच सत्याग्रह आहे.

ह.भ.प.धर्मकिर्ती परभणीकर म्हणाले, ' भाजपच्या राज्यात सलोख्याचे प्रदेश उध्वस्त करणे चालू आहे. वारकरी परंपरेचे ब्राहमणीकरण करणे चालू आहे. वारकरी मुल्यांच्या विरोधात काम सुरू आहे. आम्हीं महाराष्ट्र हातातून जावू देणार नाही. दंगली करणाऱ्या व्यक्तीच्या हाती सत्ता जावू देणार नाही'.

बिशप थॉमस डाबरे म्हणाले, 'संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचा महाराष्ट्र आहे.धर्माधर्मात असंतोष वाढीस लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अल्पसंख्य समुदायाला सुरक्षित वाटेल असे वातावरण देशात असले पाहिजे. कोणीही इतर धर्माविरोधात विधाने करता कामा नये. गरिबांची स्थिती सुधारली पाहिजे'.

गांधीभवन मधील लोकसंसदेत परिवर्तनाचा निर्धार! गांधीभवन मधील लोकसंसदेत परिवर्तनाचा निर्धार! Reviewed by ANN news network on २/०४/२०२४ ०४:५७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".