पुणे बनले अमलीपदार्थ तस्करांचे माहेरघर
पुणे : काल १९ फेब्रुवारी रोजी तिघांना ताब्यात घेऊन ५ कोटी रुपयांचा मेफेड्रोन हा अमलीपदार्थ जप्त केला होता. या पैकी हैदर शेख याच्याकडे विश्रांतवाडी येथील गोदामात सापडलेल्या मिठाच्या पिशव्यांमध्ये एकंदर ५२ किलोपेक्षा अधिक मेफेड्रोन आढळून आले आहे. याची एकंदर किंमत १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पॉल आणि ब्राऊन या २ परदेशी नागरिकांची नावे या प्रकरणात पुढे आली आहेत.
दि. १९ फेब्रुवारी रोजी पहाटे पोलिसांनी वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय 35 वर्ष, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) यांना अटक केली होती त्यांच्याकडून एकूण ५ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. हैदर शेख याच्याकडे अटक केल्यानंतर एक चावी आढळली होती. ती कशाची आहे याची विचारणा पोलिसांनी त्याच्याकडे केल्यावर ती विश्रांतवाडी येथील पत्र्याच्या गोदामाची असल्याचे त्याने सांगितले होते. पोलिसांनी गोदामाची झडती घेतल्यावर तेथे २०० ते ३०० मिठाच्या पिशव्या आढळल्या होत्या. या पिशव्यांची तपासणी केल्यावर त्यात मेफेड्रोन असल्याचे निष्पन्न झाले आहे्. मिठाच्या पिशव्यांआडून मेफेड्रोन विकले जात होते. हैदर शेखने हे मेफेड्रोन त्याला परदेशी नागरिकांनी दिल्याचे त्याने कबूल केले आहे. आता या प्रकरणात दोन विदेशी नागरिकांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळे आता पुणे हे आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ माफियांचे माहेरघर बनले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: