पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एसीपीसाठी लाच स्वीकारणारा लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात!; पोलीस आयुक्तालयात खळबळ!!
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एसीपी मुगुट पाटील यांच्यासाठी लाच स्वीकारणार्या व्यक्तीला पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये १७ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी पकडले आहे. याप्रकरणी पुण्यातील कोरेगाव पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामुळे पिंपरी चिंचवड पोलीसदलात मोठी खळबळ उडाली आहे.
ओंकार भरत जाधव असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला मागितलेल्या ५ लाख रुपयांपैकी १ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पकडण्यात आले आहे.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केलेल्या व्यक्तिविरुद्ध कात्रज कोंढवा बायपास रस्त्यानजिकच्या एका भूखंडाबाबत फसवणुकीचा अर्ज पोलिसांकडे आला होता. त्याची चौकशी एसीपी मुगुट पाटील करत होते. या व्यक्तीविरोधात भा.दं.वि. ४२० खाली गुन्हा दाखल न करता त्याला या प्रकरणात मदत करण्यासाठी मुगुट पाटील यांच्या सूचनेनुसार ओंकार जाधव याने त्या व्यक्तीकडे ५ लाख रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे याची तक्रार त्या व्यक्तीने केल्यानंतर त्याची शहानिशा केली असता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांना त्यात तत्थ्य आढळून आले.
त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी सापळा लावून ओंकार जाधव याला १ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना पकडण्यात आले.
ही कारवाई एसीबीचे उपाधिक्षक नितीन जाधव, निरीक्षक प्रसाद लोणार, सहाय्यक फौजदार, मुकुंद अयाचित, हवालदार चंद्रकांत जाधव आणि शिपाई दिनेश माने यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: