शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

चर्‍होली खुर्द येथे दरोडा घालणार्‍या टोळीस २४ तासात अटक, आळंदी पोलिसांची कामगिरी (VIDEO)

लुटला होता ९७ हजारांचा ऐवज

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील आळंदी पोलीसठाण्याच्या हद्दीमध्ये चर्‍होली खुर्द येथे २२ फेब्रुवारी रोजी रात्री एका घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत दरोडेखोरांनी ९७ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. आळंदी पोलिसांनी अतिशय त्वरेने हालचाल करत या प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळविले आते.

कोहीनूर विशाल पवार, वय २१, रा. चोराची आळंदी, ता.हवेली, जि. पुणे, धीरज उत्तम चव्हाण, वय ३५, रा. दापोडी, केडगाव, ता. दौंड, जि.पुणे, नरेश धनजी सकीरा ऊर्फ हाकला, वय २५, रा. चोराची आळंदी, ता.हवेली, जि.पुणे, पृथ्वीराज सुखदेव चव्हाण, वय २६, रा. दापोडी, केडगाव, दौंड, पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रमेश चिठ्ठल धोरवे, वय ४३, रा. मौजे च-होली खुर्द, वडगाव रोड, सुरेश नगर, ता.खेड, जि. पुणे यांनी आळंदी पोलीसठाण्यात तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २२ फेब्रुवारी रोजी रात्री थोरवे कुटुंबिय आपल्या घरात झोपले असताना रात्री अडीच ते पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा लाथ मारून तोडून पाच दरोडेखोर घरात शिरले. त्यांनी धारदार विळा, कोयता यांचा धाक दाखवून थोरवे यांची पत्नी आशा थोरवे यांच्या अंगावरील मंगळसूत्र, कर्णफुले आणि, थोरवे यांच्या खिशात असलेली रोख रक्कम असा ९७ हजार रुपयांचा ऐवज लुटून दरोडेखोर  एमएच ४२ बीजे ५५९६ क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधून पसार झाले.

थोरवे यांनी आळंदी पोलीसठाण्यात धाव घेत आपली तक्रार नोंदविली.पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत त्वरेने हालचाल करून थेऊर फाटा येथे गुन्ह्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओ चालक पृथ्वीराज सुखदेव चव्हाण याच्यासह ताब्यात घेतली. त्याने दिलेल्या माहितीवरून बाकीच्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही सर्व कामगिरी  पोलीस आयुक्तविनयकुमार चौबे, अपरआयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ निरीक्षक  सुनील गोडसे, सहायक  निरीक्षक लोहार, हवालदार लोणकर,राजू जाधव, कु-हे, नाईक सानप,  शिपाई  खेडकर, पालवे, आडे यांनी केली.  

गुन्हयाचा पुढील तपास सहायक निरीक्षक लोहार करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा