बारामती शहराच्या प्रगतीत उद्योग जगताचे महत्त्वाचे योगदान : अजित पवार

 


बारामती :  बारामतीच्या शहराला उद्योग-व्यवसायाचा समृद्ध वारसा असून शहराच्या औद्योगिक विकासात, पर्यायाने परिसराच्या प्रगतीत उद्योजकांनी मोठा हातभार लावलेला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती औद्योगिक विकास संघटनेच्यावतीने आयोजित उद्योजक मेळाव्याप्रसंगी बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खनिजदार अबीरशाह शेख, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, जागतिक पातळीवर देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आहे. सन २०२८ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर होण्यासाठी त्यावेळी राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर असली पाहिजे. याकरीता राज्य शासन विशेष  प्रयत्न करीत आहे.

उद्योगधंद्याना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. विविध उद्योगपती, व्यापारी यांच्यासोबत चर्चा करुन त्यांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. अधिकाधिक उद्योजकांना आकर्षित करुन गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. उद्योग क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासोबत आवश्यक सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात येत आहे.  विजेच्या दरात सवलत देऊन अधिकाधिक उद्योजकांना त्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न आहे.

उद्योजकांनी राज्यात माहिती व तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, डेटा सेंटर तसेच खाण उद्योग आदी विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पसंती दिली असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 'हरित हायड्रोजन धोरण' करणारे महाराष्ट्र राज्य देशातील पहिले राज्य आहे. ऊर्जा, वीज निर्मितीसाठी सौर पॅनल वापरण्यावर भर देण्यात येत असून शासकीय इमारती, सौर कृषीपंप तसेच अधिक वीज लागणाऱ्या घरगुती उद्योगधंद्याकरीता सौरऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे श्री.पवार म्हणाले.

नैतिक अधिष्ठानाने उद्योग, व्यवसाय करत असताना ते सचोटीने केले पाहिजे. उद्योग क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेचा वापर आवश्यक आहे. उद्योजक आणि ग्राहक यामध्ये विश्वाचे नाते निर्माण करुन उत्पादनाबरोबर ग्राहकांना उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण सेवा द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

'सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल' म्हणून बारामतीची ओळख

अलीकडच्या काळात बारामती तालुका विद्येचे, आरोग्याचे माहेरघर म्हणून ओळखला जात आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यवसायिक अशा सर्व क्षेत्रात बारामतीने सर्वसमावेशक प्रगती साधलेली आहे. परिसरात होत असलेल्या विविध विकासकामांमुळे राज्यात 'सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल' म्हणून तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. यामध्ये बारामतीकरांचे फार मोठे योगदान असून उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून बारामतीच्या विकासात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री.पवार यांनी केले.

विमानतळ आणि रेल्वेमुळे विकासाला गती मिळते. त्यामुळे परिसराच्या विकासासाठी बारामती ते लोणंद ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाल्यास उद्योगधंद्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बारामती येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाचे १०० खाटांची क्षमता असलेल्या मंजूर रुग्णालयांच्याकरीता पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, या रुग्णालयासाठी आणखीन १००  खाटा वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बारामती येथे २ मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

काळाची गरज ओळखून युवकांना कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. उद्योगांना अधिक कुशल कामगार मिळण्यासह बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता राज्यातील प्रत्येक महसूली विभागात 'नमो महारोजगार मेळावा' आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि नमो हब स्किल मॅनेजमेंट प्रा. लि यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ मार्च रोजी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पुणे विभागाचा 'नमो महारोजगार मेळावा' आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

बारामतीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कंपन्या आणून त्याद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आज परिसरातील उद्योजक छोट-मोठे उद्योग उभारुन उत्पादनाची निर्यात करण्यापर्यंत यशस्वी झाले आहेत. वडिलोपार्जित आणि पारंपरिक उद्योगाचा विस्तार करताना आजच्या पिढीने त्यामध्ये काळानुरूप नवनवीन उद्योग सुरु केलेले आहेत. उद्योग क्षेत्राने अशीच प्रगती करीत शहराच्या विकासातही सहभागी व्हावे, असेही श्री. पवार म्हणाले.

बारामतीतील उद्योजकांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक घेणार

बारामती औद्योगिक विकास संघटनेच्या विविध मागणीच्या अनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत, संबंधित विभागाचे अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत मंत्रालयीन स्तरावर बैठक आयोजित करुन मागण्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

यावेळी उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार, उद्योगमित्र पुरस्कार, निर्यातदार लघुउद्योजकांचा सन्मान करण्यात आला. तसेच संघटनेच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बारामती क्लब येथे आयोजित औद्योगिक प्रदर्शनाला भेट देऊन उत्पादनाची माहिती घेतली.

यावेळी बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष श्री. जामदार यांनी विचार व्यक्त केले.

बारामती शहराच्या प्रगतीत उद्योग जगताचे महत्त्वाचे योगदान : अजित पवार बारामती शहराच्या प्रगतीत उद्योग जगताचे महत्त्वाचे योगदान : अजित पवार Reviewed by ANN news network on २/१७/२०२४ ०७:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".