दिवाळीचे मूळ स्वरूप !
दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दिवाळी उत्सव सुरू आहे. दिवाळी भारतातच नव्हे, तर विदेशातही उत्साहाने साजरी केली जाते.
आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलीप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण धनत्रयोदशीला दिवाळीत न धरता, दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे, असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः ते सण वेगवेगळे आहेत. प्रत्येक दिवसाचे धार्मिक आणि अध्यात्म शास्त्रीय महत्त्व आहे.
दिवाळीचे पालटलेले स्वरूप !
दिवाळी म्हटली की आठवते ते अभ्यंगस्नान, घरी तयार केलेला फराळ, किल्ला बांधणे, पणत्यांची आरास आणि रांगोळ्या ! आजकाल मात्र याचे मूळ स्वरूप पालटले आहे. दिवाळी पहाट कार्यक्रमांची रेलचेल, विकत आणलेला फराळ किंवा मिठाई आणि चॉकलेट, विजेच्या दिव्यांच्या माळा, कर्णकर्कश गाणी आणि फटाके, हिऱ्यांच्या दागिन्यांची भेट या सर्व गोष्टींमध्ये खऱ्या दिवाळीचे रूप लुप्त झाले आहे.
पूर्वी दिवाळीच्या आधी सर्वजण मिळून घराची साफसफाई करणे, पणत्या रंगवणे, फराळ बनवणे हे सर्व एकत्रितपणे करत होते. सध्याची परिस्थिती निराळी असून लाडू, चिवडा, चकली, करंजी इत्यादी सर्व पदार्थ विकत मिळतात आणि तेही वर्षभर ! त्यामुळे त्या पदार्थांचे नाविन्य, ते बनवण्यासाठी लागणारे पाककौशल्यही लुप्त होत आहे. त्यातच पुन्हा डाएट सांभाळावे लागत असल्याने या सर्व पदार्थांना फाटा दिला जातो; पण त्याचवेळी पिझ्झा, पास्ता आणि कॅडबरी चॉकलेट मात्र आवडीने खाल्ले जातात आणि भेटही दिले जातात. घरचा फराळ शेजाऱ्यांना देण्याऐवजी विकतची मिठाई भेट दिली जाते असे सर्वसाधारण चित्र आहे .
स्वदेशी दिवाळी साजरी करा !
पणत्या विकत आणून त्या लावणे, घरी आकाश कंदील बनवणे या ऐवजी विकतचे चित्रविचित्र आकारांचे आकाश कंदिल आणि विजेच्या माळा लावण्याकडे आज अधिक कल दिसून येतो. यामुळे या सणाची सात्विकता तर कमी होतेच; पण त्याचबरोबर परकीय चलन आणि उद्योगधंद्यांना अधिक चालना मिळत आहे. यातून एकप्रकारे देशाच्या पारंपारिक अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो. यावर उपाय म्हणून खरे तर स्वदेशी उत्पादकांकडून आणि भारतीय पारंपारिक वस्तू विकत घ्यायला हव्यात. यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल.
दिवाळी पहाट एक इव्हेंट !
आजकाल लहान मोठ्या सर्वच शहरात ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमांचा सुळसुळाट झाला आहे. काही काळापूर्वी अश्या कार्यक्रमांमध्ये भजन, शास्त्रीय गायन, भावगीते यांचे कार्यक्रम आयोजित होत. भारतीय संस्कृतीचे महत्व समजून त्याचे संवर्धन व्हावे हा त्यामागे मुख्य उद्देश होता; पण आता मात्र त्याचे रूपांतर एक इव्हेंट म्हणून झाले आहे. या कार्यक्रमांना केवळ एक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दुसरीकडे दिवाळीचे खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची विक्री करणे याला केवळ बाजारी आणि स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे. घराघरात होणारे अभ्यंगस्नान, पणत्यांची आरास, घरातील सर्वांनी मिळून केलेला फराळ या गोष्टी हळूहळू लुप्त होत चालल्या आहेत. ‘दिवाळी पहाट’सारख्या कार्यक्रमांनी आपल्या दिवाळीतील संस्कृतीची जागा घेतली आहे. भावी पिढीसमोर अश्या संस्कृतीचा आदर्श ठेवणे हे खेदजनक आहे. यासाठी दिवाळीचे शास्त्रीय महत्व जाणून त्यानुसार ती साजरी करायला हवी.
घातक फटाके आणि पैशांचा चुराडा !
दिवाळीत फोडले जाणारे फटाके हा आणखी एक ज्वलंत विषय ! मुळातच त्याला कोणताही धर्मशास्त्रीय किंवा अध्यात्मशास्त्रीय आधार नाही. केवळ मौज मजा या नावाखाली यासाठी देशभर शेकडो कोटी रुपये खर्च केले जातात. फटाक्यांवर श्रीलक्ष्मी, श्रीगणेश अश्या देवतांची चित्रे असणारे फटाके लक्ष्मीपूजनाचे दिवशी फोडून आपल्याकडून नकळतपणे या देवतांची विटंबना होते हे लक्ष्यात येत नाही. आपल्या देवतांची अशी विटंबना होणार नाही याकडे आपणच लक्ष द्यायला हवे. लक्ष्मीपूजनाच्या माध्यमातून ज्या लक्ष्मीची आपण पूजा करतो, त्याच दिवशी तिची अशी विटंबना झाली तर श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल का ? तसेच त्यातून निर्माण होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण ? याशिवाय यामुळे होणारे श्वसनाचे आजार, भाजणे, अपघात होणे अश्या दुःखदायी घटनांमुळे होणारे त्रास आणि दुःख याचे स्वरूप भयावह असेच आहे. या सर्व घटनांचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
परकीय संस्कृतीचा शिरकाव !
आजकाल कोणताही भारतीय सण आला, की चॉकलेटच्या आणि परदेशी बदाम, पिस्ते यांच्या जाहिरातींचे पेव फुटते. खरेतर प्रत्येक सणाला कोणत्या वस्तू बनवाव्यात, कोणत्या वस्तू भेट स्वरूपात द्याव्यात हे रूढी परंपरेनुसार ठरलेले आहे आणि त्याला आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्वही आहे. संपूर्ण भारतात त्या त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार हे ठरलेले आहे; परंतु हल्लीच्या काळात त्याला एकच रंग देऊन परकीय बाजारपेठेला उभारी देण्याचा भाग केला जात आहे असे निदर्शनास येते. आजकाल सोन्याच्या दागिन्यांच्या ऐवजी हिऱ्यांचे आणि प्लॅटिनमचे दागिने भेट देण्याची पद्धत रूढ होत चालली आहे. मग ते परवडत नसतील, तरीही ते घेण्याचा अट्टाहास केला जातो. भारत ही इतकी मोठी बाजारपेठ आहे की काही टक्के लोकांनी जरी या वस्तू खरेदी केल्या, तरी भरपूर नफा या आस्थापनांना मिळतो. यातून होणारी हानी लक्ष्यात घेऊन योग्य कृती करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा आणि इतरांना पण असे करण्यास उद्युक्त करायला हवे. यातूनच सणाचा खरा आनंद लाभणार आहे. यासाठी पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्याऐवजी भारतीय पद्धतीने दिवाळी साजरी करून दिवाळीच्या या लखलखत्या पर्वाचा खऱ्या अर्थाने लाभ करून घेऊया !
- प्रा. विठ्ठल जाधव
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२३ ०६:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: