27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पुण्यात भव्य "कथा कीर्तन" महोत्सव!; भारतीय विद्या भवन - इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे आयोजन

 


पुणे : महाराष्ट्रातील शेकडो वर्षांच्या  कीर्तन परंपरांचा परिचय आजच्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने 

भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने दि. 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या सप्ताहामध्ये भव्य "कथा कीर्तन महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले आहे. 

  या सप्ताहामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता विविध कीर्तन परंपरांचे सादरीकरण होणार आहे. त्यात पारंपरिक वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन व राष्ट्रीय कीर्तन अशा विविध परंपरांचा समावेश आहे. 

भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहेंदळे व संचालक व मानद सचिव प्रा. नंदकुमार  काकिर्डे यांनी या कीर्तन महोत्सवाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. 

या कीर्तन सप्ताहाचा प्रारंभ सोमवार दि. 27 नोव्हेंबर रोजी  भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष श्री. संदीप महाराज पळसे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पारंपरिक वारकरी कीर्तनाने होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन इन्फोसिसच्या विकास केंद्राचे ( डेव्हलपमेंट सेंटर) पुणे विभागाचे प्रमुख श्री प्रवीण व्ही.कुलकर्णी व श्री. रजनीश मालविया यांच्या हस्ते व  संत साहित्याचे जेष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत होणार  आहे.

सप्ताहातील दुसरे पुष्प मंगळवार दि. 28 नोव्हेंबर रोजी देहू येथील ह .भ. प. आचार्य वैभव महाराज राक्षे यांच्या पारंपरिक वारकरी कीर्तनाने गुंफले  जाणार आहे. महोत्सवाचे तिसरे पुष्प बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी कीर्तन स्वर मंजुषा श्रीमती अंजली कऱ्हाडकर  व त्यांची कन्या शिवानी कऱ्हाडकर  या माय - लेकींच्या "कीर्तन संवादाद्वारे " गुंफले जाणार आहे. गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी कीर्तन विशारद श्री. श्रेयस संजय कुलकर्णी यांच्या  नारदीय कीर्तनाने सप्ताहातील चवथे पुष्प गुंफले जाणार आहे. सप्ताहातील पाचवे पुष्प शुक्रवार दि. 1 डिसेंबर रोजी कीर्तनचंद्र श्री श्रेयस बडवे व किर्तन चंद्रिका सौ मानसी बडवे  पती-पत्नीच्या " कीर्तन जुगलबंदीने" गुंफले जाणार  आहे. 

या मालिकेतील सहावे पुष्प शनिवार दिनांक 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांच्या राष्ट्रीय कीर्तनाने गुंफले जाणार आहे.

महोत्सवाच्या  अखेरच्या दिवशी म्हणजे रविवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी १०  ते १२ दरम्यान " कीर्तन परंपरा - काल, आज व उद्या" या महत्त्वाच्या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ माध्यम तज्ञ  प्रा.डॉ. विश्राम ढोले,  तत्वज्ञान व प्राच्य विद्या यांचे अभ्यासक व  संशोधक डॉ. प्रणव गोखले सहभागी होणार असून ह .भ. प. प्रा. अभय टिळक हे परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत. याच दिवशी सायंकाळी सहा वाजता  कीर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे.

 यावेळी प्रारंभी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षा श्रीमती लीना मेहंदळे यांचे  "महाभारतातील किर्तन परंपरा"  यावर व्याख्यान होणार असून त्यानंतर  ठाणे येथील युवा कीर्तनकार श्री अमेय बुवा  रामदासी यांचे रामदासी कीर्तन सादर होणार आहे. 

भारतीय विद्या भवनच्या सेनापती बापट रस्त्यानजीकच्या  सरदार महादेव बळवंत नातू  सभागृहामध्ये या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  पुणे शहर व जिल्ह्यातील कीर्तन महाविद्यालयाचे विद्यार्थी, अभ्यासक, रसिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय विद्या भवन तर्फे करण्यात आले आहे.


27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पुण्यात भव्य "कथा कीर्तन" महोत्सव!; भारतीय विद्या भवन - इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे आयोजन 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पुण्यात  भव्य "कथा कीर्तन" महोत्सव!; भारतीय विद्या भवन - इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे आयोजन Reviewed by ANN news network on ११/२१/२०२३ ०३:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".