डावीकडून अधिवक्त्या सुवर्णा आव्हाड, अधिवक्ता भरत देशमुख, श्री विवेक सिन्नरकर,डॉ अमित थडानी
पुणे : रोग्याला त्रास देणाऱ्या जंतूंना बाहेर काढल्याशिवाय रोगी बरा व्हायला आरंभ होत नाही, तसेच तपासातील रहस्ये बाहेर काढल्याशिवाय समाजाला सत्य कळणार नाही, याची जाणीव झाल्याने मी हे पुस्तक लिहिले. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सिद्ध करण्यात आला होता, तो केवळ हिंदु धर्माच्या विरोधात होता. तो कायदा पारित झाला नाही, पण दाभोलकरांच्या हत्येनंतर त्यांच्या स्मृतीनिमित्त पारित करण्यात आला. दाभोलकर यांचे नक्षलवाद्यांसोबत असणारे आर्थिक व्यवहार याचा कुठेही उल्लेख केला जात नाही. मात्र सर्व हिंदुत्ववाद्यांचे भ्रमणभाष 'टॅप' करून खोटे आरोप करून त्यांना अटक केले गेले. वामपंथी लोकांची मानसिकता हिंदू विरोधी आहे. कोणालाही या हत्या कोणी केल्या हे शोधण्यात रस नसून केवळ राजकीय कारणांनी हे खटले प्रेरित आहेत, असे परखड प्रतिपादन सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. अमित थढानी यांनी केले. गरवारे महाविद्यालयाजवळील ‘कोहिनुर मंगल कार्यालय' येथे 8 ऑक्टोबर या दिवशी डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी चेअरमन अधिवक्ता भरत देशमुख, मुंबई उच्च न्यायालयातील प्रथितयश फौजदारी अधिवक्त्या सुवर्णा आव्हाड, पुस्तकाचे लेखक डॉ.अमित थढानी, तसेच ज्येष्ठ हिंदुत्ववादी लेखक आणि गीता विवेक ग्रंथ कर्ते श्री. विवेक सिन्नरकर उपस्थित होते.
यावेळी पुरोगाम्यांनी भयभीत केलेल्या वातावरणात हात घालण्याचे धाडस डॉ थढानी यांनी केले असे मत अधिवक्त्या सुवर्णा आव्हाड यांनी केले. तर रोगी विचारांना उघडे पाडण्यासाठी चिरफाड करण्याचे कार्य डॉ थढानी यांनी या पुस्तकाद्वारे केल्याचे विवेक सिन्नरकर यांनी सांगितले. खटला चालू द्यायचा नाही आणि आरोपींना कोठडी बाहेर येऊ द्यायचे नाही अशा कटाचे हे कारस्थान असल्याचे मत भरत देशमुख यांनी व्यक्त केले.
आपला विवेक जागृत ठेवून सत्याला साथ देत आपण सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावे असे आवाहन श्री. विवेक सिन्नरकर यांनी या वेळी केले.या कार्यक्रमाला 200 हून अधिक जणांची उपस्थिती लाभली.
Reviewed by ANN news network
on
१०/०९/२०२३ ०८:३९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: