मुंबई : संभाजी नगर व नांदेड येथे घडलेल्या दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. अशा दुर्घटनांकडे पाहताना सर्व पक्षांनी, मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्ष असोत, राजकारण विसरून सर्वांनी एकत्र येऊन अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये. एखादी घटना घडल्यावर तिला कायमस्वरूपी राजकीय वलय देऊन राज्याच्या प्रमुखांना व उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाचे नेते करत आहेत, ते योग्य नाही. आरोग्य यंत्रणांमध्ये जर काही त्रुटी विरोधकांना आढळल्या असतील. तर त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, त्याबद्दल काही सूचना असतील तर त्या मुख्यमंत्र्यांकडे मांडाव्यात. फक्त दौरे करून व पत्रकार परिषदा घेऊन सरकारला बदनाम करण्याचे काम करू नये, असे आवाहन शिवसेना उपनेते, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना केले केले.
मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, कोविड काळात अनेकांना सरकारविरोधात राजकारण करण्याची संधी होती. आम्ही सुद्धा राजकारण करू शकलो असतो. त्यावेळेस एकीकडे आम्हीच कोविड विरोधात सर्वोत्कृष्ट काम करत आहोत, असे तत्कालीन मुख्यमंत्री सांगायचे, तर दुसरीकडे देशात ५,३२,००० मृत्यू झालेत, त्यातील १,४८,५६१ महाराष्ट्रात झालेत. ही देखील माहिती आहे. कोविड काळात जेव्हा फिरायचे होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री घरी बसून फेसबुक लाईव्ह करायचे आणि आता मात्र दौरे करत आहेत, असा टोला देखील उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना लगावला.
महाराष्ट्र सरकारची यंत्रणा कोविड नियंत्रणामध्ये कमी पडल्याचे अहवाल अनेक संस्थांनी केंद्राकडे पाठवले होते. कोविडमध्ये शव ठेवण्यासाठी बॅग वापरली जायची, ती बॅग पुणे, कोल्हापूर, ठाण्यामध्ये ३५० ते ४०० रुपयांना मिळायची तीच बॅग मुंबई महानगरपालिकेमध्ये ६५०० रुपयांना खरेदी केली गेली ही तफावत नंतर कॅग चौकशीदरम्यान समोर आली. कोविड काळात उद्धव ठाकरे सरकारने भ्रष्टाचार केलाय हे आता उघड झाले आहे. पण त्यावेळेस आम्ही मात्र कोविडचे राजकारण केले नाही, कारण त्यावेळेस परिस्थिती बिकट होती. पण आता मात्र विरोधी पक्षाचे नेते याबाबत सरकारशी कोणतीही चर्चा न करता राज्यातील सरकारला बदनाम करण्याचे काम करत आहे, अनेक महत्वाच्या बैठकांना अनुपस्थित राहतात, जे पूर्णपणे अयोग्य आहे, उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
उदय सामंत पुढे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उघडणार हा आमच्या सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा व गरजेचं निर्णय आहे, कारण ही काळाची गरज आहे. नांदेड आणि रत्नागिरीत सुद्धा मेडिकल कॉलेज लवकरच उघडणार आहोत तसेच येणाऱ्या काही दिवसांत आम्ही महाराष्ट्रासाठी काय काय केले याचा लेखाजोखा जनतेपुढे रोज मांडणार आहोत. जेणेकरून आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना देखील आमच्या कामाची माहिती मिळायला हवी.
आमच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याबाबत उदय सामंत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावे किंवा जाऊ नये हा सर्वस्वी त्यांचा व त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल. याबाबतची भूमिका आमचा शिवसेना पक्ष घेऊ शकत नाही. परंतु त्यांनी मुख्यमंत्री म्हणून मागील ५ वर्षांत काम केले होते, त्याचा उपयोग आज महाराष्टराचा विकास करताना होत असल्याचा स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.
प्रवक्त्यांनी भूमिका ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाची भूमिका नसते तर एकनाथ शिंदे यांची भूमिका शिवसेना पक्षाचीभूमिका असते असे उदय सामंत यांनी माहिती दिली.
Reviewed by ANN news network
on
१०/०९/२०२३ ०९:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: