पुणे: सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान ५ ऐवजी ६ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केला आहे.
केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ अन्वये सण उत्सव कालावधीसाठी १५ दिवसांसाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरासाठी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. त्यानुसार १६ फेब्रुवारी २०२३ च्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सन २०२३ च्या सण उत्सवांकरिता १३ दिवस निश्चित करुन २ दिवस राखीव ठेवण्यात आले होते. त्यामध्ये गणेशोत्सवाकरीता ५ दिवस निश्चित करण्यात आले होते.
तथापि, विविध लोकप्रतीनिधी व गणपती मंडळे यांनी पुणे शहरात आणि जिल्ह्यात सार्वजनिक गणपती उत्सवामधील सातव्या दिवशी गणपती विसर्जन केले जात असल्याने सदर दिवसही विशेष बाब म्हणून वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती. त्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनीही परवानगी देण्यात हरकत नसल्याचे कळविले आहे. त्यानुसार राखीव २ दिवसांपैकी १ दिवस गणेशोत्सवासाठी (गणेशोत्सवातील सातवा दिवस) सूट देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जारी केले आहेत.
गणेशोत्सवासाठी यापूर्वीच्या आदेशानुसार शनिवार २३ सप्टेंबर (पाचवा दिवस- गौरी विसर्जन), रविवार २४ सप्टेंबर (सहावा दिवस), मंगळवार २६ सप्टेंबर (आठवा दिवस), बुधवार २७ सप्टेंबर (नववा दिवस), गुरुवार २८ सप्टेंबर (दहावा दिवस- अनंत चतुर्दशी) असे पाच दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता नव्याने सोमवार २५ सप्टेंबर २०२३ (सातवा दिवस) सह एकूण सहा दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
९/२१/२०२३ ०२:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: