पुणे : नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू शिंदे याने आज पहाटे येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
तीन वर्षांपूर्वी कोपर्डीतील नववीत शिकणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील तीन नराधमांनी बाईकवरून पाठलाग केला. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची अमानुष हत्या केली. या घटनेनंतर राज्यासह देशात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पप्पू शिंदे याच्यासह तीन आरोपींना नगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २०१७ ला दोषी ठरविले होते. याप्रकरणी पप्पू शिंदे हा सुमारे पाच वर्षांपासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.
येरवडा पोलिसांनी या मृत्यूची नोंद केली आहे. ही घटना निदर्शनास आल्यानंतर तुरुंग उपमहानिरीक्षक अमिताभ गुप्ता येरवडा कारागृहात पोहोचले. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी कोपर्डीत वेळोवेळी आंदोलने झाली. काल सायंकाळीच प्रशासनाच्या आश्वासनानंतर यासाठी पुकारलेले चक्री उपोषण मागे घेण्यात आले.
या प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ याने झालेल्या शिक्षेला मुंबईत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हाने दिले होते. तर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सरकारच्यावतीनेही उच्च न्यायालयात प्रकरण नेण्यात आले आहे. आरोपी भवाळ याने मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून हे संपूर्ण प्रकरण औरंगाबादहून मुंबईला वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यानुसार हे प्रकरण मुंबईला वर्ग झाले. सध्या खटल्याची सुनावणी प्रलंबित आहे. या काळात तिन्ही आरोपींना येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते.
Reviewed by ANN news network
on
९/१०/२०२३ ११:४६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: