लोकसहभागातून व श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याच्या मोहिमेला गती द्यावी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

 


ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे श्रमदान

पुणे : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत होणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब अडविणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकसहभागातून आणि श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याच्या मोहिमेला गती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. 

भोर तालुक्यातील रांजे या गावामध्ये जिल्हाधिकारी डॉ. देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी स्वतः उपस्थित राहून श्रमदान केले व विविध वनराई बंधाऱ्यांना भेटी दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात पावसाची अनियमितता व पावसातील खंड तसेच दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण व पावसाचे दिवस कमी होत आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यांत सातत्याने पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होऊन पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. पुणे जिल्ह्यात काही गावांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असले तरी त्या ठिकाणी पाणी साठवणूक होत नसल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होत असते.

यावर्षी अल निनो च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात ५० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. त्याअनुषंगाने लोकसहभागातून व श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याची मोहिम ८ सप्टेंबरपासून हाती घेतली आहे. जिल्ह्यात आजअखेर ३०० पेक्षा जास्त वनराई बंधारे बांधून झाले आहेत. तसेच मोहीमेअंतर्गत विविध ठिकाणी वनराई बंधारे निर्मितीचे काम प्रगतीपथावर आहे. 

सर्व यंत्रणा, सामाजिक संस्था, जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी श्रमदान करून या मोहीमेत जास्तीत सहभाग नोंदवावा व जिल्ह्यात जास्तीत जास्त वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करावी असे अवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

१८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या मोहीमेस अधिक गती येण्यासाठी वनराई संस्थेतर्फे क्षेत्रिय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

लोकसहभागातून व श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याच्या मोहिमेला गती द्यावी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख लोकसहभागातून व श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याच्या मोहिमेला गती द्यावी- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख Reviewed by ANN news network on ९/१६/२०२३ १०:१४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".