पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल ऋषीकेश गजानन अरणकल्ले यांना मल्लखांब या क्रीडाप्रकारातील नैपुण्यासाठी २०२०-२०२१ या वर्षीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिनांक २८ रोजी बालेवाडी क्रीडानगरी येथे प्रदान करण्यात आला.
ऋषीकेश अरणकल्ले हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात नेमणुकीस आहेत. त्यांचे गाव पुणे जिल्हयातील इंदापूर आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण निगडी पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेत झाले आहे. तेथे त्यांना मल्लखांब खेळण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी महाराष्ट्र मंडळ, पुणे येथे गेले तेथे त्यांनी उत्तम प्रकारे सराव केला.
त्यांनी जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये अनेक बक्षिसे मिळवली आहेत. सन २०१४ साली ते मल्लखांब या खेळ कोटयातून सातारा पोलीस दलात रुजू झाले. सातारा पोलीस दलात असताना त्यांनी सन २०१७ मध्ये मध्यप्रदेश मधील उज्जैन येथे झालेल्या ३३ व्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक तसेच पोल मल्लखांब प्रकारात कांस्यपदक मिळविले. सातारा पोलीस दलात ०४ वर्षे काम केल्यानंतर सन २०१८ साली त्यांची पिंपरी चिंचवड शहरात बदली झाली. त्यानंतर पुढील ०४ वर्षे, त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस दलाकडून राष्ट्रीय स्पर्धाना गवसणी घातली. सन २०१८ मध्ये फोंडा गोवा येथे झालेल्या ३५ वी राष्ट्रीय अजिंक्य मल्लखांब स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक आणि टांगता मल्लखांब प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. सन २०२२ मध्ये उज्जैन मध्यप्रदेश येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय अजिंक्य पदक मल्लखांब स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक मिळवले.
नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांचा सराव सुरू असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची धडपड आणि जिद्द कायम असल्याने ऋषीकेश अरणकल्ले यांना सन २०२०-२०२१ चा मल्लखांब या क्रीडा प्रकारात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्याबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अपरआयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे यांनी त्यांचा सत्कार करून कौतुक केले. तसेच पुढील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. स्पर्धांच्या सरावाकरिता पुरेसा वेळ मिळावा म्हणून कायम स्वरुपी विशेष सवलत देण्याची घोषणा केली आहे.
Reviewed by ANN news network
on
९/०२/२०२३ ०४:१८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: