बाबू डिसोजा, कुमठेकर
निगडी प्राधिकरण : मन प्रसन्न करणारी सनातन हिंदू ही एकमेव संस्कृती आहे. या संस्कृतीला संस्थापक नाही. ठरवून दिलेला एक धर्मग्रंथ नाही. वर्षानूवर्षे धर्म ग्रंथावर अनेकजण आपली मते मांडतात. नवीन पुस्तके काढतात. असे अन्न संस्कृतीत होत नाही. त्यामुळे बदलत्या जगानुसार बदलणारी हिंदू सनातन संस्कृती आहे. मन प्रसन्न करणारी हिंदू संस्कृती एकमेव असल्याचे मत डॉ.संजय उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्री समर्थ युवक प्रतिष्ठान व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित... 'मन करा रे प्रसन्न' या कार्यक्रमाला नागरिकांचा भरगच्च प्रतिसाद मिळाला. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींसह विविध विषयांवर समर्पक, अचूक भाष्य करत, कविता सादर करत प्राधिकरणवासीयांचे मन डॉ. उपाध्ये यांनी प्रसन्न केले. निगडीतील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला माजी नगरसेवक, पवना सहकारी बँकेचे संचालक अमित राजेंद्र गावडे, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा अर्चना वर्टीकर आदी उपस्थित होते.
डॉ.संजय उपाध्ये म्हणाले, समोरच्याचे मन दुखवायचे नाही. लोक साहित्य, कलेची निर्मिती भारतात प्रामुख्याने ज्ञान आणि प्रबोधन अशा दोन्ही मनोरंजनाच्या माध्यमातून व्हावी. किंवा यापैकी एक तरी व्हायला हवी. केवळ मनोरंजन ही पाश्चिमात्य संकल्पना आहे. भारताची नाही. राजकारणामुळे महाराष्ट्र भारतभर गाजत आहे. हा प्रत्येकाच्या मनाचा परिणाम आहे. कोणाचे मन कोठे धावेल हे कळत नाही. सध्याचे राजकारण म्हणजे वेगवेगळ्या विचारांचे हिंदू एकत्र आले. आणखी काय हवे आहे. मन प्रसन्न करणारी एकमेव संस्कृती आहे. ती म्हणजे सनातन हिंदू संस्कृती आहे. या संस्कृतीला संस्थापक नाही. ठरवून दिलेला एक धर्मग्रंथ नाही. वर्षानूवर्षे धर्म ग्रंथावर अनेकजण आपली मते मांडतात. नवीन पुस्तके काढतात. असे अन्य संस्कृतीत होत नाही. त्यामुळे बदलत्या जगानुसार बदलणारी हिंदू सनातन संस्कृती श्रेष्ठ आहे. सगळे पक्ष एकत्र यायला लागले तेव्हा मन प्रसन्न व्हायला लागले. भारतात महाराष्ट्र का हे नंतर कळले. मनोरंजन करता करता प्रबोधन करण्याचा मुद्दा भारतीय संस्कृतीत प्रबळ आहे.
मनासारखी माणसे नाही मिळाली की मन अप्रसन्न होते. आपल्याला चॉइसची संधी नसल्याने मन प्रसन्न होत नाही. उणीव असेल तिथे धावत जाणे त्यामुळे मन अप्रसन्न राहते. पैसा स्थिर करत नाही. तो पळायला लावतो. पैसा साधन आहे, साध्य नाही. पैसे भरपूर मिळूनही माणसे असमाधानी असतात. वर्तमानपत्रही मन अप्रसन्नच करते. कारण, भ्रष्ट्राचार, खून मारामाऱ्याशिवाय बातम्या आणि जाहिरातीशिवाय काय असते. सांस्कृतीक राजधानीत असंस्कृत वाहतूक होते. डोके असूनही लोक हेल्मेट घालत नाहीत. ज्या कारणांची परिस्थिती समजली नाही तीही अप्रसन्नता आहे. स्वतःला पाण्यात बघितल्यास दुसऱ्याला पाण्यात बघावे लागत नाही. आत्मचिंतनात स्वतःचे दोष काढावे. जग तुमच्याबरोबर हवे असेल तर 'तुमचे बरोबर आहे' हे वाक्य लक्षात ठेवावे. आयुष्यभर विद्यार्थीच रहायचे, कोणाला शिकवायला जायचेच नाही. अज्ञान, अतिरेकात विनोद दडलेला असतो, असेही डॉ.उपाध्ये म्हणाले.
मुख्य कार्यक्रमाआधी, अविनाश पाठक व सौ. शीतल म्हसतकर यांनी, स्वरसंध्या हा हिंदी मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे नेटके निवेदन, चंद्रशेखर जोशी यांनी केले!
निरागस आणि प्रामाणिक चेहऱ्याचा नगरसेवक मी आयुष्यात पहिल्यांदा बघितला, असे मत डॉ उपाध्ये यांनी नोंदवले.
अमित गावडे यांचे राजकारणाव्यतिरिक्त काम आहे. त्यांच्या कार्याला समाजकारणाची मोठी जोड असल्याचे गौरवोद्गार डॉ.उपाध्ये यांनी काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अमित राजेंद्र गावडे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी केले. तर, अर्चना वर्टीकर यांनी आभार मानले.
मन प्रसन्न करणारी हिंदू संस्कृती : डॉ.संजय उपाध्ये
Reviewed by ANN news network
on
८/२८/२०२३ १०:५९:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/२८/२०२३ १०:५९:०० AM
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: