रत्नागिरी : कोकणात जोरदार पाऊस पडत असून जगबुडी व नारंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे खेड- दापोली मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
खेडमधील सर्व शाळांना आज सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. शहरातील जगबुडी नदीने पुराची पातळी ओलांडली असून, खेड शहरात मच्छी मार्केट भागात पुराचे पाणी भरले आहे. तेथील दुकानदार दुकाने बंद करून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. काही मदत लागल्यास कार्यकर्त्यांशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
नारिंगीनदीच्या पुराचे पाणी कन्याशाळेजवळ रस्त्यावर आले असल्याने दापोली खेड रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. खेड, खांबतळे येथील झोपडपट्टीमधील नागरिकांना नगरपरिषद बालवाडी येथील शाळेत शिफ्ट केले आहे. जगबुडीच्या बाजूस असलेल्या झोपडपट्टीमधील लोकांना मुकादम हायस्कू्मलध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
याखेरीज बोरघर (कातकरी वस्ती) येथील 4 घरांना पाणी लागले असल्याने 4 घरांतील 22 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. मौजे भोस्ते गावातील रस्त्यावर जगबुडी नदीचे पाणी आल्याने भोस्ते-अलसुरे वाहतूक बंद करण्यात आली आहे. अलसुरे येथील मशिदीच्या भोंग्यावरून नागरिकांना सुरक्षितस्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंबावली येथील धनगर वाडी कडे जाणाऱ्या रस्त्याला भेगा पडल्या असून रस्त्यांवर झाड पडले आहे. खारी गावात पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्याने शेजारील घरात 4 कुटुंबांचे सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
७/१९/२०२३ ०२:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: