नवी दिल्ली : शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून लांबणीवर पडत आहे. याप्रकरणी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आता सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय तातडीने घेण्यास विधानसभा अध्यक्षांना सांगणार की अन्य काही निर्देश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर आज सव्वा अकराच्या सुमारास सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. सुनील प्रभू यांचे वकील आज न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत. सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सुनावणी करावी की विधानसभा अध्यक्षांना नोटीस द्यावी? यावर आज न्यायालय निर्णय देणार आहे. मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती नरसिंहा आणि मिश्ना यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.
आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेत दोन महिने उलटून गेल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांकडून निर्णयाबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याचा दावाकरण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कालमर्यादेत घेण्याचे निर्देशही याचिकेत नमूद करण्यात आले आहेत.
या प्रकरणी आपले मत व्यक्त करताना ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे म्हणाले की, राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी १५ दिवसांत निर्णय घेणे अपेक्षित होते. सुनावणीनंतर न्यायालय लगेच आदेश देऊ शकते. पण तसे होण्याची शक्यता नाही. तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. गुंतागुंतीचे प्रकरण असल्यास तीन महिन्यांत निर्णय द्यावा लागतो. पण कायद्याचे तत्त्व आणि घटनात्मक तरतुदी पाहता न्यायालय विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादा देऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालय सातत्याने त्यांचा आदर करत निर्णय देत आहे. अपात्र कोण हे ठरवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. फक्त राहुल नार्वेकर यांना अंमलबजावणी करायची आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: