जळगाव: जळगावातील कालिका मंदिराजवळ असलेल्या स्टेट बँक शाखेत दोन दिवसांपूर्वी दरोडा पडला होता. या गुन्ह्याची उकल जळगाव पोलिसांनी २४ तासात केली. या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. हा दरोडा पोलीस खात्यात उपनिरीक्षक असलेल्या एकाने आपल्या बापासोबत मिळून घातला असून त्याला बँकेत काम करणा-या त्याच्या नातेवाईकाने साह्य केले आहे. जळगाव पोलिसांनी आज ३ एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शंकर जासक, रमेश जासक आणि मनोज सूर्यवंशी अशी या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. या पैकी शंकर जासक हा पोलीस उपनिरीक्षक असून तो रायगड जिल्ह्यात नोकरीस होता. त्याला निलंबित करण्यात आले होते. गेले वर्षभर तो आजारपणाच्या रजेवर असून पोलीस महासंचालकांनी त्याला नोकरीतून बडतर्फ़ करण्याचे निर्देश रायगड जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. मनोज सूर्यवंशी हा बँकेत ऑफिस बॉय म्हणून करार पध्दतीने नोकरीस होता. त्याने दिल्या माहितीवरून शंकर जासकने हा कट रचला आणि आपल्या बापाच्या साह्याने तडीस नेला.
गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी बँकेतील कर्मचा-यांचे जबाब घेतले असता मनोज सूर्यवंशी याच्या जबाबात तफ़ावत आढळली. तसेच त्याचे वागणेही संशयास्पद वाटले; त्यामुळे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर सूर्यवंशी याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच दरोड्यातील ऐवज शंकर जासक कर्जत येथे आपल्या घरी घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सर्व यंत्रणा तपासाकामास लावली. दरम्यान गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कुसुंबा बसस्थानकाजवळ आढळली. तर बँकेचा डीव्हीआर, हेल्मेट, कर्मचाऱ्यांचे मोबाईल एमआयडीसी परिसरातील एक नाल्यात सापडले. पोलिसांनी जासक याला त्याच्या मिळालेल्या पत्त्यावर जाऊन ताब्यात घेतले.
आरोपींकडून लुटलेल्या ऐवजापैकी ३ कोटी ६० लाखांचे सोने आणि १६ लाख ४० हजार रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. उर्वरित ७० हजार रुपये हस्तगत करणे अद्याप बाकी आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: