मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक

 


वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे यंत्रणांना निर्देश

पुणे : पुणे शहरात पावसाळ्यामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सर्व उपाययोजनांची कामे संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले. 

मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात काल (गुरुवारी) आयोजित बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महामेट्रो, टाटा मेट्रो, पी.एम.आर.डी.ए., सार्वजनिक बांधकाम विभाग, कटक मंडळ, पी.एम.पी.एम.एल.चे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पुणे शहरामध्ये पावसाळ्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे, मेट्रो मार्ग, मेट्रो स्थानकांची कामे व त्याचा राडारोडा रस्त्यावर असल्याने होणारी वाहतूक कोंडी, शहरात सुरु असलेली उड्डाणपुलांची कामे, स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत सुरु असलेल्या खोदकामामुळे पावसाचे पाणी साचण्याची ठिकाणे आदींच्या अनुषंगाने उपाययोजनांविषयी विचारविनिमय करण्यात आला. 

गटारे, नालेसफाईचे काम गतीने पूर्ण करावे तसेच गटारांची तुटलेली झाकणे बदलावीत असे निर्देश यावेळी देण्यात आले. पावसाळी (स्टॉर्मवॉटर) पाईप लाईन,  पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन वगैरे कामामुळे रस्त्यात पडलेला राडारोडा काढून घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या.

पावसाळ्यामध्ये वाहतूक नियमानाकरीता पुणे मनपा, महामेट्रो, टाटा मेट्रो यांच्याकडून वाहतूक शाखेस अतिरिक्त वॉर्डन पुरविण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.

आंबील ओढा, कोळेवाडी नाला, दळवी नगर चौक, आंबेगांव नाला, जांभुळवाडी नाला आदींच्या नालेसफाईबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पीएमपीएमएल बसेस नादुरुस्त होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. वाहतूकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे तात्काळ काढावीत असेही सांगण्यात आले.

अचानक पाऊस झाल्यास उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. सर्व संबंधित यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय रहावा याकरीता सर्व संबंधित स्वायत्त संस्थांच्या कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार असून जलद प्रतिसादासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये तातडीने संदेशाचे आदानप्रदान करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. 

मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक Reviewed by ANN news network on ६/०१/२०२३ ०४:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".