पुणे : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढच्या काही तासात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
धुळे, नंदुरबार, नाशिक जळगाव, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. यावेळी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तण्यात आली आहे. येत्या ३ ते ४ तासात नाशिक आणि जळगावमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान जळगावात आज दुपारी १२ च्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर दाणादाण उडाली. एका ठिकाणी भिंत कोसळून त्याखाली सापडून एकजण जखमी झाला.
धुळे शहरातील काही भागात गारा पडल्या. शिरपूर, साक्री तालुक्यांतील काही भागांत गारांसह जोरदार पाऊस झाला.
नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी आज वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. तळोदा, अक्कलकुवा, धडगाव परिसरात जोराचा पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
अचानक झालेल्या वादळी पावसात तळोदा तालुक्यातील विहीरमाळ येथील शेतकऱ्यांच्या जवळपास 35 बकऱ्या मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: