पिंपरी : पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नागरिकांना अडवून लूटमार करणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
अभिषेक लक्ष्मण भोसले (वय 20, रा. निर्मल बेतानी शाळेसमोर, विजयनगर, काळेवाडी पुणे), विजय सिध्दार्थ म्हस्के (वय 20, रा. शिंदे यांचे खोलीत, आझाद कॉलनी नं. 3, पाचपीर चौक, काळेवाडी, पुणे), शांतकुमार चंद्रशेखर ददुल (वय 20, रा. पाडाळे यांचे खोलीत, क्रांती चौक, विजयनगर, काळेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापैकी आरोपी अभिषेक भोसले व विजय म्हस्के हे दाखलेबाज गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरुध्द दरोडा व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
पुणे मुंबई महामार्गावर खंडणी विरोधी पोलीस पथकात गस्त घालत असताना त्यांना नंबरप्लेट नसलेली एक मोटारसायकल आढळली. पोलिसांनी मोटारसायकलस्वाराला थांबण्याचा इशारा केला. परंतु तो त्याच्या दोन साथीदारांसह पळून जाऊ लागला.
पोलिसांनी पाठलाग करून त्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पुणे मुंबई महामार्गावर एका व्यक्तीला लुटल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून लॅपटॉप, दुचाकी, कोयता, दोन मोबाईल फोन असा एकूण 95 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.
ही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उध्दव खाडे, सहायक फौजदार अशोक दुधवणे, अंमलदार सुनिल कानगुडे, विजय नलगे, गणेश गिरीगोसावी, किरण काटकर, प्रदीप गोडांबे व रमेश गायकवाड यांनी केली आहे.
Reviewed by ANN news network
on
५/०७/२०२३ ०२:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: