तरुणांना बेरोजगारीच्या गर्तेत लोटणार्‍या राज्यसरकारला निवडणुकीत बेरोजगारच अद्दल घडवतील! : अजित गव्हाणे यांची प्रतिक्रिया

तरुणांना बेरोजगारीच्या गर्तेत लोटणार्‍या राज्यसरकारला निवडणुकीत बेरोजगारच अद्दल घडवतील! अजित गव्हाणे यांची प्रतिक्रिया पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात बेरोजगारी किती प्रचंड प्रमाणात वाढली आहे याचे दाहक वास्तव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पद भरती प्रक्रियेने दाखवून दिले. महापालिकेने मागविलेल्या 386 पदांसाठी 1 लाख 30 हजारांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याचे वास्तव शहरातीलच नव्हे तर राज्यातील बेरोजगारीचे विदारक चित्र दाखवते. इथली बेरोजगारी काही प्रमाणात कमी करू शकणारा ’वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातच्या पायाशी वाहणार्‍या कर्मदरिद्री शासनाला हे बेरोजगारच निवडणुकीत मतदानाच्या रूपाने अद्दल घडवतील आणि याची सुरुवात पिंपरी-चिंचवड शहरापासूनच होणार, अशी सडेतोड प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पत्रकाद्वारे दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध 386 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले असता तब्बल 1 लाख 30 हजार 470 अर्ज प्राप्त झाले. बेरोजगारीच्या या दाहक वास्तवावर बोट ठेवत अजित गव्हाणे यांनी भाजपचा समाचार घेतला. ते म्हणाले की, पिंपरी -चिंचवड शहरासह राज्यात बेरोजगारीची दाहकता किती आहे त्याचे हे एक अत्यंत बोलके उदाहरण आहे. महापालिकेकडे आलेले सर्व अर्ज राज्यभरातील बेरोजगारांचे आहेत. वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात असता तर यापैकी किमान 50 टक्के बेरोजगारांना नक्कीच नोकरीची संधी मिळाली असती. अशा शब्दात अजित गव्हाणे यांनी राज्य सरकारला आरसा दाखवला. बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दूरदृष्टीने आणि धडाकेबाज निर्णयांमुळे पिंपरी-चिंचवड शहर जगाच्या नकाशावर आले. टाटा, बजाज यासारख्या मोठ्या प्रकल्पांना पिंपरी -चिंचवड शहरात आणून इथेच रोजगारनिर्मिती करून दिली. तळेगाव, चाकण, रांजणगावातील औद्योगिकरण वाढवले. हिंजवडी, तळवडे, खराडीसारख्या आयटी पार्क्सने राज्यातीलच नव्हे तर देशभरातील युवकांच्या हाताला काम दिले. आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा पर्यायाने आपल्या राज्याचा इतका सखोल आणि संवेदनक्षम विचार करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी इथला प्रत्येक युवक ठामपणे उभा राहणार असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड शहरातील बेरोजगार युवा वर्गाला रोजगार उपलब्ध करून दिल्याचे येथील प्रत्येक सुजाण नागरिक मान्य करेल. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच्या भ्रष्ट कारभाराला विटलेल्या नागरिकांबरोबरच इथला संतप्त बेरोजगार युवावर्गही भाजप राज्यकर्त्यांना त्यांची खरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत बेरोजगारांच्या उद्रेकाचा प्रत्यय नक्कीच मिळणार, असा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला.
तरुणांना बेरोजगारीच्या गर्तेत लोटणार्‍या राज्यसरकारला निवडणुकीत बेरोजगारच अद्दल घडवतील! : अजित गव्हाणे यांची प्रतिक्रिया तरुणांना बेरोजगारीच्या गर्तेत लोटणार्‍या राज्यसरकारला निवडणुकीत बेरोजगारच अद्दल घडवतील! : अजित गव्हाणे यांची प्रतिक्रिया Reviewed by ANN news network on ९/२१/२०२२ १०:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".