रविवार, १९ डिसेंबर, २०२१
पिंपळे गुरव येथील खून प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल राजकीय वर्चस्वाच्या स्पर्धेतून खून झाला असल्याची चर्चा
पिंपरी : शहरातील पिंपळे गुरव येथे काटेपुरम चौकात शनिवारी सकाळी योगेश जगताप या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी गणेश बाजीराव ढमाले, अक्षय केंगले (दोघे रा. सांगवी) या दोघांना अटक करण्यात पोलिसांना रविवारी यश आले आहे. या दोघांना सांगवीमध्ये अटक करण्यात आली आहे.
मृत योगेश जगताप याचा भाऊ जितेश जगताप यांने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून गणेश हनुमंत मोटे, अश्विन आनंदराव चव्हाण, गणेश बाजीराव ढमाले, अभिजित बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश उर्फ मोनू सपकाळ, अक्षय केंगले, निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते, राजन उर्फ बबलू रवी नायर, महेश तुकाराम माने, निलेश मुरलीधर इयर (सर्व रा. सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी काटेपुरम चौकात दत्त जयंतीनिमित्त योगेश जगताप याने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी तो कार्यक्रमाच्या ठिकाणी आला होता. सकाळी साडेदहा वाजता एकाने त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जीव वाचविण्यासाठी योगेश जगताप पळत सुटला, त्यांच्यात झटापट देखील झाली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. आरोपीने जगताप याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या असून पैकी दोन गोळ्या त्याला लागल्या. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी वातावरण तंग बनले. त्यामुळे त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. दंगल नियंत्रण पथक,सीआरपीएफचे पथक तैनात करण्यात आले.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता, दोन आरोपी योगेश यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहेत. योगेश जगताप आणि संशयित आरोपी दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. जगताप याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून कट रचला. परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून योगेश जगताप याच्यावर गोळ्या झाडल्या.
आरोपींपैकी गणेश हनुमंत मोटे आणि अश्विन अनंतराव चव्हाण या दोघांनी गोळीबार केल्यानंतर रस्त्याने दुचाकीवरून जाणाèया गौरव किशोर कर्णावट (वय ३७, रा. दापोडी) यांना पिस्तुलाचा धाक दाखवला आणि त्यांची दुचाकी पसार होण्यासाठी जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी गौरव कर्नावट यांच्या फिर्यादीनुसार आरोपी गणेश आणि अश्विन यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत योगेश जगताप हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, शस्त्र बाळगणे यांसारखे सात गुन्हे दाखल होते. त्याने अलीकडच्या काळात जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. तो राजकारणात देखील सक्रिय झाला होता. त्याच्या पत्नीने महापालिका निवडणूक लढवली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याने रविवारी काटेपुरम चौकात दत्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान त्याच्यावर गोळीबार झाला.
आरोपी गणेश मोटे हा देखील सराईत गुन्हेगार आहे. त्याला सन २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याच्यावर चोरी, जबरी चोरी, दुखापत, मारामारी, दंगा करणे असे सुमारे २० गुन्हे दाखल आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये सांगवी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून सात लाखांचे दागिने जप्त केले होते. त्याने मौजमजा करण्यासाठी तसेच पबमध्ये पैसे उधळण्यासाठी चेन चोरीचे गुन्हे केल्याचे पोलिसांना सांगितले होते.
मयत योगेश जगताप याच्या कार्यकर्त्यांनी आरोपी गणेश मोटे याच्यावर दोन वर्षांपूर्वी वार केले होते. तेंव्हापासून मोटे याच्या मनात जगताप याच्याविषयी सल होता. जगताप हा मोटेला चारचौघात भाव देत नव्हता, त्याचा देखील मोटेच्या मनात राग होता. त्यातूनच त्याने कट रचून जगताप याचा खून केला असल्याचे म्हटले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा