पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे कार्य महान असून त्यांच्या कार्यास साजेसे स्मारक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वतंत्र जागेवर उभारण्यात येईल असा निर्णय महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी जाहीर केला.
पिंपरी येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयामागील मोकळ्या जागेत रमाई यांचे उचित स्मारक उभारण्यात येणार आहे. नियोजित स्मारकासाठी स्वतंत्र जागा मिळावी अशी मागणी विविध संघटनांनी महानगरपालिकेकडे केली होती. या नियोजित स्मारकाची माहिती तसेच आढावा घेण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच भारतीय बौद्ध महासंघाचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर महानगरपालिकेत आले होते. त्यांच्यासमवेत नुकतीच महापालिका भवनामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीत भीमराव आंबेडकर यांनीदेखील स्वतंत्र स्मारक उभारण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. या सर्व बाबींवर विचार विनिमय करुन तसेच जनसामान्यांच्या भावना लक्षात घेता त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे स्मारक स्वतंत्र जागेत उभारण्याचा निर्णय महापौर माई ढोरे यांनी घेतला आहे.
जनभावनेचा आदर राखत रमाई यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न स्मारकाच्या माध्यमातून महानगरपालिका करणार आहे. या स्मारकामध्ये माता रमाई यांचा पुर्णाकृती पुतळा तसेच म्युरल्स् आणि बहुउद्देशीय उपक्रम राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे. यासाठी लागणारा वाढीव निधी देखील उपलब्ध करुन देण्यात येईल असे महापौर ढोरे यांनी सांगितले. यावेळी दिली. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक राहुल जाधव, क्रीडा कला समिती सभापती उत्तम केंदळे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, सागर आंगोळकर, संतोष लोंढे, राजेंद्र गावडे, सीमा सावळे, आशा धायगुडे शेडगे, सुलक्षणा शिलवंत धर, शांताराम भालेकर आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिका उभारणार रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक
Reviewed by ANN news network
on
१२/१७/२०२१ १०:२७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: