लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत लोणावळा नगरपरिषद लोणावळा आणि वावळे तसेच साळुंके या दोन्ही परिवाराच्या संयुक्त विद्यमानाने पुनम सखाराम वावळे व अनंत भरत साळुंखे यांचा विवाहामध्ये शुन्य कचरा लग्न समारंभ ही संकल्पना राबवून लग्न समारंभ पार पाडण्यात आला. या अभिनव लग्न सोहळ्याची सध्या शहरात सर्वत्र जोरदार चर्चा आहे.
या लग्न सोहळ्यात प्लॅस्टिकचा वापर हा पूर्णपणे टाळलेला होता. यावेळी कचरा कसा निर्माण होणार नाही यावर बारकाईने लक्ष देण्यात आले होते. विविध टाकाऊ कागद व छत्री यापासून मांडवात डेकोरेशन करण्यात आले होते. पिण्यासाठी स्टीलचे ग्लास होते. तसेच टाकाऊ पत्रावळ्या ऐवजी परत वापरण्या योग्य ताटे वाट्या वापरण्यात आल्या होत्या. पिण्याचे पाणी व हात धुण्याच्या जागेवर पाण्याचा अपव्यय टाळा, जेवढे लागेल तेवढेच अन्न घ्या असे संदेश देऊन जनजागृती करण्यात आली होती. पार्किंग व जेवण स्थळ दर्शविण्यासाठी साध्या कागदावर दिशा दर्शविला होता. कोठेही डिजिटल बोर्डचा वापर करण्यात आला नव्हता, त्याऐवजी पारंपरिक कापडी बोर्ड चा वापर करण्यात आला होता.
लग्न समारंभासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना फुट सॅनिटायजरचा वापर करण्यास बंधनकारक ठेवलेले होते. सर्वाना मास्क लावूनच हॉल मध्ये प्रवेश देण्यात येत होता. लग्नात कोविड 19 चे नियम पाळण्यात आले होते. तसेच नगरपरिषदेने आलेल्या सर्व पाहुण्यांना प्लान्टेबल पेनचे वाटप केले. सदर पेन हा पुठयापासून बनविलेला असून त्याचे पाठीमागे तुळस, कोथंबीर, टॉमटो इ. झाडांचे बिया होत्या. सदर पेन खराब झालेवर पेन कुंडीत टाकल्यास किंवा जमिन पुरल्यास सदर पेनमधील बियांमुळे झाडे येतात.
संपुर्ण लग्न समारंभात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करणेसाठी जागोजागी दोन डस्टबिन ठेवलेले होते. शौचालयात सॅनिटरी व्हेडींग मशिन, सॅनिटरी पॅडसाठी वेगळे बिन ठेवण्यात आलेले होते. लग्न समारंभाचे वेळेस नवरा व नवरीच्या उपस्थितीमध्ये स्वच्छता व वसुंधरा शपथ घेण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी यांनी उपक्रमाची माहिती दिली तसेच वधू वरांस शुन्य कचरा लग्न समारंभात सहभागी झालेबाबतचे प्रशस्तीपत्रक देण्यात आले. या लग्नाची नोंद करणेकरीता विवाह नोंदणी अर्ज त्वरीत देण्यात येवून नोंदणी करणेबाबत प्राधान्य देण्यात आले. वधू वरांस एक तुळशी वृदांवन, सॅनिटायझर, मास्क, प्लान्टेबल पेन, पुष्पगुच्छ इ. देवून सन्मानित करण्यात आले.
वरील प्रमाणे आगळ्या वेगळ्या पध्दतीने वावळे व साळुंखे परिवाराने शुन्य कचरा लग्न समारंभ राबवून शहरात एक आदर्श निर्माण केलेला आहे. याप्रसंगी लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, आरोग्य सभापती रचना सिनकर, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीधर पुजारी, नगरसेवक देविदास कडू, उपमुख्याधिकारी डॉ. भगवान खाडे, कार्यालयीन अधिक्षक शरद कुलकर्णी, भांडारपाल दत्तात्रय सुतार, अक्षय पाटील, विजय लोणकर, जितेंद्र राऊत, खंडू बोभाटे इ. नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोणावळा नगरपरिषदेने राबवला शून्य कचरा लग्न सभारंभ हा अभिनव उपक्रम
Reviewed by ANN news network
on
१२/२९/२०२१ १०:३१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: