गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

पिंपरी चिंचवड महापालिका पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यातील मतभेद वाढले?

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात 11 ते 22 डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय हॉकी स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेच्या आयोजकात पिंपरी चिंचवड महापालिकेचा समावेश आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या स्पर्धेच्या आयोजनासाठी 32 लाख 25 हजार रुपये खर्च करण्यास अनुमती देण्यात आली. याच दिवशी शहरातील एका आलिशान हॉटेलमध्ये या स्पर्धेच्या आयोजकांची बैठक झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त राजेश पाटील उपस्थित होते. मात्र, महापौर माई ढोरे, स्थायी समिती सभापती ऍड. नितीन लांडगे तसेच क्रीडा समिती सभापती प्रा. उत्तम केंदळे यांना बोलावण्याची तसदी ना आयोजकांनी घेतली ना आयुक्त राजेश पाटील यांनी. या प्रकाराबाबत स्थायी समिती सभापती लांडगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
 पिंपरी चिंचवड महापालिका आणि इतर संस्थांनी हॉकी इंडियाच्या मान्यतेने  ही स्पर्धा आयोजित केली आहे. 11 ते 22 डिसेंबर या कालावधीत पिंपरीतील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर ही स्पर्धा होणार आहे.  महापालिका या स्पर्धेची सह आयोजक असल्यामुळे पत्रकार परिषदेसाठी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावणे उचित होते.  मात्र त्यापैकी कोणालाही निमंत्रित करण्यात आले नाही.  पत्रकार परिषदेला महापालिका आयुक्त पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पिंपरी चिंचवडचे पोलिसआयुक्त आदी उपस्थित होते.

 या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती नितीन लांडगे म्हणाले, “अशा कोणत्याही पत्रकार परिषदेची मला माहिती नाही.  किमान महापौरांना पत्रकार परिषदेला बोलवायला हवे होते.
  हॉकी स्पर्धेचा खर्च महापालिका उचलत आहे त्यामुळे  प्रशासनाने पत्रकार परिषदेबद्दल पदाधिकाऱ्यांना कळवले असते तर आम्ही तेथे उपस्थित राहू शकलो असतो.”

मागील आठवड्यात, शहरातील शाहूसृष्टी  आणि फुलेसृष्टी या दोन प्रकल्पांचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निमंत्रित न करता त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आले, त्याबद्दल वाद उपस्थित झाला होता. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाला आणि आयुक्त पाटील यांना मंत्रालयातून कानपिचक्या मिळाल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, उपायुक्त विकास ढाकणे यांच्यासह कोणीही  वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले नव्हते. आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांच्या या वर्तनाबद्दल महापौर आणि सभागृहनेता नामदेव ढाके यांनी नाराजी व्यक्त केली होती.

 त्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा हॉकी स्पर्धेच्या आयोजनासंबंधीच्या पत्रकार परिषदेस महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्याचे टाळल्यामुळे पदाधिकारी नाराज आहेत.

 हा सर्व घटनाक्रम प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील मतभेद वाढत असल्याचे चिन्ह आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा