रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१
काँग्रेसच्या दापोली तालुकाध्यक्षांची कन्या राष्ट्रवादीत
रत्नागिरी : दापोली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनंत उर्फ भाऊ मोहिते यांच्या कन्येने शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला या प्रवेशाच्या वेळी दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष परवीन शेख यादेखील उपस्थित होत्या या प्रकारामुळे दापोली तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मोहिते यांची कन्या दिपाली मोहिते पवार यांनी शनिवारी सुतारवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत दापोली शहरातील शिवसेनेचे वाहिद शेख, युवा सेनेचे आदिल शेख, सलमान मुजावर, वासिफ अजवानी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या कार्यक्रमासाठी दापोलीच्या नगराध्यक्षा परवीन शेख या देखील उपस्थित होत्या; त्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत.
अलीकडेच राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन जाधव यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रअध्यक्ष संदीप राजपुरे यांनी राष्ट्रवादीत, तर राष्ट्रवादीच्या माजी सभापती व पंचायत समिती सदस्य ममता शिंदे यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता.
दरम्यान, दापोली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १२, बुरुड आळी, बौद्धवाडी हा प्रभाग अनुसूचित जातीमधील महिलांसाठी आरक्षित झाला असून या प्रभागातून आता दीपाली मोहिते-पवार या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा