पुण्याच्या हातकागद संस्थेवरील माहितीपटाला 'स्वतंत्रता विज्ञान फिल्म फेस्टिवल' मध्ये द्वितीय पारितोषिक
आंतरराष्ट्रीय सायन्स फिल्म फेस्टिव्हलसाठीही निवड
पुणे :पुण्याच्या हातकागद संस्थेवरील 'हातकागज संस्था -भारत की एक विरासत ' या माहितीपटाला ' स्वतंत्रता विज्ञान फिल्म फेस्टिवल' मध्ये द्वितीय पारितोषिक मिळाले आहे . पुण्यातील प्राध्यापक डॉ बाळकृष्ण दामले(फुलब्राईट स्कॉलर) यांनी हा माहितीपट तयार केला आहे.
केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय 'विज्ञान प्रसार 'विभागामार्फत,फिल्म्स डिव्हिजन ,विज्ञान भारती आणि माहिती प्रसारण मंत्रालय यांनी संयुक्तपणे हा फिल्म फेस्टिवल भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला होता . भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात शास्त्रज्ञ ,शिक्षक ,विज्ञान संवादकांच्या योगदानाला त्यातून उजाळा देण्यात आला . याच माहिती पटाची आंतरराष्ट्रीय सायन्स फिल्म फेस्टिव्हल(गोवा) साठी निवड झाली असून हा फेस्टिवल १० डिसेंबर पासून डॉ विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरु होत आहे.
'हातकागज संस्था -भारत की एक विरासत ' या माहितीपटाची निर्मिती डॉ बाळकृष्ण दामले यांनी केली . संपादन वासिम पठाण ,निवेदन मोहिनी दामले यांचे आहे तर लेखनासाठी प्रभाकर गोसावी ,दिनेश लोहपात्रे यांनी विषयतज्ज्ञ या नात्याने मार्गदर्शन केले . द्वितीय पारितोषिक प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र नुकतेच डॉ दामले यांना प्राप्त झाले .
अशा प्रकारची हातकागद संस्था असावी ही मूळची महात्मा गांधी यांची कल्पना होती . पुण्यातील एक संशोधक कृष्णाजी बापुजी उर्फ के. बी. जोशी यांच्या संशोधन आणि संकल्पनेतून १९४० मध्ये ही संस्था साकारली गेली. पं. नेहरू यांनी संस्थेचे उद्घाटन केले होते. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्थेला भेट दिल्यानंतर येथील हातकागदाचे उत्पादन पाहून या संस्थेत तयार झालेल्या कागदांवरच घटना लिहिली जावी अशी सदिच्छा व्यक्त केली होती .
'या माहितीपटाला राष्ट्रीय पारितोषिक मिळणे ही पुण्यासाठी अभिमानाची बाब आहे,कारण जोशी यांच्यासारखे समर्पित शास्त्रज्ञ,संशोधक पुण्यात जन्मले आणि हातकागद संस्थेसारखी संस्था पुण्यात आहे.'अशी प्रतिक्रिया डॉ बाळकृष्ण दामले यांनी व्यक्त केली
पुण्याच्या हातकागद संस्थेवरील माहितीपटाला 'स्वतंत्रता विज्ञान फिल्म फेस्टिवल' मध्ये द्वितीय पारितोषिक
Reviewed by ANN news network
on
११/२७/२०२१ ०६:५४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: