बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून दिगंबर दळवी यांचा अभिनव उपक्रम

खेड:शहरातील इलेक्ट्रॉनिक्स,केबल व्यावसायिक व मुरडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिगंबर दळवी यांनी गावातील दोन शाळा, ग्रामपंचायत कार्यालय व ग्राम देवस्थान व्यवस्थापन समिती कार्यालयात  लोकमतचे दीपोत्सव दिवाळी अंक स्वनिधीतून भेट दिले. 

ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या एका छोटेखानी ग्रामपंचायत येथील कार्यक्रमात सरपंच सोनाली जाधव  उपसरपंच यास्मिन माखजनकर,  विद्यमान सदस्य मनोहर  शिबे, सदस्या निधी शिगवण, ग्रामसेवक महेश नक्षे यांच्या उपस्थितीत सरपंच सोनाली जाधव,उपसरपंच यास्मिन माखजनकर व दिगंबर दळवी यांच्या हस्ते या अंकांचे वितरण करण्यात आले.

 यावेळी केंद्र शाळा मुरडेचे मुख्याध्यापक हिरामण मोहिते,  कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक रेवाळे, सरपंच सोनाली जाधव व ग्राम देवस्थान व्यवस्थापन समितीचे  उपाध्यक्ष दिगंबर दळवी यांनी हे अंक स्वीकारले. 

ग्रामीण भागातील वाचकांना विशेषतः विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे दिगंबर दळवी यांनी सांगितले. 

वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मराठी भाषाप्रेमींनी पुढे येऊन अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत सरपंच सोनाली जाधव यांनी व्यक्त केले. 

यावेळी  माजी सदस्य मुश्ताक माखजनकर,  निवडणूक अधिकारी व्ही. के. चौरे, तलाठी यादव तसेच गावातील आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ  उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सांगता ग्रामसेवक महेश नक्षे यांनी उपस्थितांचे आभार मानून केली.
--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा