राज्यातील ३३४ खासगी रुग्णालयांवर बंदी; आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती, आशा स्वयंसेविकांच्या मानधनावरही आश्वासन
मुंबई, १७ जुलै २०२५: दरपत्रक न लावणाऱ्या तसेच इतर नियमांचे पालन न करणाऱ्या ३३४ खासगी रुग्णालयांवर बंदी घातली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत दिली. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपस्थिती आणि आशा स्वयंसेविकांच्या मानधनाबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत माहिती दिली.
३३४ खासगी रुग्णालयांवर बंदी, ४८०७ रुग्णालयांना नोटिसा
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, एकूण २३ हजार ३५४ रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. यापैकी ४ हजार ८०७ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, नियम मोडणाऱ्या ३३४ खासगी रुग्णालयांवर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून दरवर्षी रुग्णालयांची तपासणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, 'बॉम्बे नर्सिंग ॲक्ट'मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील अधिवेशनात विधेयक आणले जाईल, असे आबिटकर यांनी आमदार प्रशांत बंब आणि मनोज जामसुतकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती बंधनकारक असून, त्यांना तिथे राहता यावे यासाठी निवासस्थानांची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर उपस्थित नसतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या प्रश्नावर दिले.
आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मानधनावर आश्वासन
काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे गेल्या पाच ते सहा महिन्यांचे मानधन प्रलंबित असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांच्या मानधनात वाढ केली जाणार आहे का, अशी विचारणाही केली. यावर बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे मानधन यापुढे प्रलंबित राहणार नाही, असे आश्वासन दिले.
पंढरपूर विकास आराखडा पूर्ण करण्याचे निर्देश
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर येथील सुधारित तीर्थक्षेत्र आराखडा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील असे विधानसभेत सांगितले. या आराखड्याअंतर्गत पंढरपुरातल्या सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे देण्यात येणार असून, यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील, अशी माहिती पवार यांनी आमदार हेमंत रासने यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर दिली.
Maharashtra Assembly, Prakash Abitkar, Ajit Pawar, Private Hospitals, Health Department, ASHA Workers, Pandharpur Development Plan, Public Health, Healthcare Regulations
#Maharashtra #HealthMinister #PrakashAbitkar #AjitPawar #Hospitals #ASHAWorkers #Pandharpur #LegislativeAssembly #PublicHealth

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: