देहू/आळंदी, १५ जुलै २०२५: संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांनी यंदाचा आषाढी पालखी सोहळा परत येताना आषाढ वद्य दशमी, म्हणजेच २० जुलै २०२७ रोजी आळंदी येथे मुक्कामी येणार असल्याचे जाहीर केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे ७५० वे जयंती वर्ष आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ३७५ वे वैकुंठ गमन वर्ष या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधून हे ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे.
आळंदी संस्थानचे निमंत्रण स्वीकारले
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने ११ जुलै २०२५ रोजी श्री संत तुकाराम महाराज संस्थानला पत्र पाठवून पालखी सोहळा परत येताना आळंदी येथे मुक्कामी येण्याचे निमंत्रण दिले होते. या निमंत्रणामुळे श्री संत तुकाराम महाराजांचे सर्व वंशज आणि मोरे मंडळींना अत्यंत आनंद झाला आहे. त्यांनी या निमंत्रणाचा स्वीकार करत, पालखी सोहळा नियोजित दिवशी आळंदीत दाखल होईल असे कळवले आहे.
१६८५ सालच्या आठवणींना उजाळा
या निमित्ताने एक जुनी परंपरा पुन्हा जिवंत होत आहे. सुमारे १६८५ साली संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराजांनी जेव्हा पालखी सोहळा सुरू केला होता, तेव्हा पालखी पंढरपूरला जाताना आणि परत येताना श्री क्षेत्र आळंदी मार्गेच प्रवास करत होती. या ऐतिहासिक घटनेमुळे त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे.
वारकरी परंपरेनुसार स्वागत करण्याची विनंती
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष विक्रमसिंह मोरे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, २० जुलै २०२७ रोजी रविवारी पालखीसह वारकरी आळंदीत दाखल होतील. या वेळी वारकरी परंपरेनुसार महाराजांच्या पालखीचे स्वागत व्हावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
ऐतिहासिक संगम
दोन महान संतांच्या जयंती आणि वैकुंठ गमन वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या पालख्यांचा हा संगम वारकरी सांप्रदायासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि अविस्मरणीय क्षण असेल. या ऐतिहासिक घटनेची वारकरी आणि भाविकांमध्ये उत्सुकता आहे.
Sant Tukaram Palkhi, Alandi, Dehu, Sant Dnyaneshwar Palkhi, Ashadhi Wari, Warkari Tradition, Maharashtra News, Palkhi Sohla
#PalkhiSohla #SantTukaram #SantDnyaneshwar #Alandi #Dehu #AshadhiWari #Warkari #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: