गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून साकुर्डे येथील मठात गौरव सोहळा
पुणे, दि. ११ जुलै २०२५: श्री स्वामी समर्थ मठ मंदिर समिती, साकुर्डे यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा 'श्री स्वामी समर्थ भूषण पुरस्कार' यंदा श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी न्यासाचे माजी प्रमुख विश्वस्त म्हाळसाकांत नारायण जेजुरीकर (आगलावे), श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त आणि माजी प्राचार्य डॉ. नारायण टाक, तसेच श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे यांना प्रदान करण्यात आला.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून, पुरंदर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनिता (काकी) कोलते यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ मठ मंदिर, साकुर्डे येथे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोख रक्कम, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. देवस्थानांच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या विश्वस्तांचा या निमित्ताने गौरव करण्यात आला. हा पुरस्काराचा दहावा वार्षिक सोहळा होता.
पुरस्कारार्थींकडून कृतज्ञता आणि मनोगत:
म्हाळसाकांत जेजुरीकर (आगलावे) यांनी सन्मानित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "आजपर्यंतच्या सामाजिक जीवनात व्यतीत केलेल्या काळाचा, कार्याचा आणि सेवेचा आपण मान ठेवलात आणि एका सामान्य व्यक्तिमत्त्वाचे मनोबल वाढवून समाजाची आणखीन सेवा करण्यासाठी ऊर्जा दिली त्याबद्दल दिलेल्या पुरस्काराचा सन्मानाने स्वीकार करतो," असे ते म्हणाले. प्रा. डॉ. नारायण टाक यांनी त्यांच्या भाषणात स्थानमहात्म्य, प्रा. दिनकरराव थोपटे यांच्या चित्रकला, शिल्पकला आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती देऊन उपस्थितांची मने जिंकली, तर डॉ. प्रसाद खंडागळे यांनी ऐतिहासिक गोष्टींची उकल करून श्रोतावर्ग भारावून टाकला. सौ. सुनिता (काकी) कोलते यांनी "सर्व पुरस्कारार्थींमुळे या पुरस्कारालाच एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे," असे गौरवोद्गार काढले.
गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्याची लगबग:
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ मठ मंदिर समिती, साकुर्डे यांच्याद्वारे श्री स्वामी समर्थ मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक कार्याची लगबग सुरू होती. पहाटे काकड आरती, रुद्राभिषेक, स्वामी याग, अन्नछत्र भूमिपूजन, भजन, सामूहिक आरती आणि अन्नदान करीत गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. श्री. गोविंदकाका बेलसरे यांनी मठातील सर्व धार्मिक विधी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण केले. याप्रसंगी समितीतर्फे उपस्थितांना झाडांची रोपे भेट म्हणून देण्यात आली.
ज्येष्ठ चित्रकार प्रा. दिनकर थोपटे, रणधीर खवले, बिभीषण झांजे, दीपक थोपटे, संतोष पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुसूदन जगताप यांनी केले तर बिभीषण झांजे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: