दिलीप शिंदे
सोयगाव - "गावातल्या समस्या गावात शोधून त्याचे उत्तर गावातच शोधले पाहिजे. गावातील लोकांनी त्यावर एकत्रितपणे काम केले पाहिजे," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत ग्रामविकास गतिविधी संयोजक विलासआण्णा दहीभाते यांनी केले.
सोयगाव येथे रविवारी (दि. ४) सकाळी दहा वाजता समर्पण फाऊंडेशन व करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन विलास दहीभाते यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यात बोलताना दहीभाते म्हणाले, "गावातील उत्पादित होणाऱ्या वस्तू-पदार्थांना गावातच मार्केट उपलब्ध करून दिले पाहिजे. आपण प्रथम त्या वस्तूंना प्राधान्य देऊन खरेदी केली पाहिजे आणि विदेशी, ब्रँडेड वस्तूंचा आग्रह सोडला पाहिजे. असे केल्यास आपले गाव आणि आपली माणसं आत्मनिर्भर होतील." समर्पण फाऊंडेशनच्या माध्यमातून सोयगाव-आमखेडा येथे हे प्रयत्न यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"पूर्वी आपली गावे समृद्ध होती कारण गावात परस्परावलंबित्व होते आणि त्यामुळे गाव स्वावलंबी होते. परस्परावलंबित्व कमी होत असल्यामुळे गावे स्वावलंबी व आत्मनिर्भर राहिली नाहीत. यावर मात करण्यासाठी आपल्याला गावातील समस्यांचे उत्तर गावातच शोधावे लागेल," असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले, "समर्पण फाऊंडेशन तरुणांनी सुरू केलेली संस्था पाहून खूप आनंद झाला. ग्रामीण भागातील तरुण जर एवढे उच्च ध्येय आणि समाजहिताचा विचार करून असे कार्य सुरू करत असेल तर ही अभिमानाची गोष्ट आहे." ते पुढे म्हणाले, "मी सुद्धा याच भागातील एक सामान्य कार्यकर्ता असून गावातील समस्या मी पण पाहिल्या आहेत. आज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी काम करतो. समर्पण फाऊंडेशनला आम्ही सर्वतोपरी मदत करू."
समर्पण फाऊंडेशनचे प्रमुख हर्षल फुसे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सोयगाव तालुक्यातील काही स्वयंस्फूर्त तरुणांनी मिळून समाजाभिमुख काम करण्यासाठी ग्राम विकास, पर्यावरण संवर्धन, आरोग्यसेवा, कृषी अशा विविध क्षेत्रात सेवाकार्य करण्याचा संकल्प केला आहे. त्याच अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. "या माध्यमातून आम्ही गाव स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत," असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान जीवन राजपूत व अनंत जगताप यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील सुरडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कल्पेश जोशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समर्पण फाऊंडेशनचे प्रमुख हर्षल फुसे, हेमंत नागपुरे, राजू फुसे, रवी गिरी, राहुल फुसे, अनिल फुसे, संकेत बैरागी, आकाश गव्हाड, सागर कोथलकर, सुरेश ढगे, मनोहर आगे, शंकर मिसाळ, सुदर्शन बारी, शुभम बोडखे, यश वामने, अनिल मोरे, सागर इंगळे, मंगेश ताडे, शिवा आगे, ओम रोकडे, विशाल परदेशी, मयुर राजपूत आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
............................................
#RuralDevelopment
#Soygaon
#SamarpanFoundation
#VillageSelfReliance
#CareerGuidance
#RSSInitiative
#LocalEconomy
#YouthEmpowerment
#GramVikas
#MaharashtraVillages
Reviewed by ANN news network
on
५/०५/२०२५ १०:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: